राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा संसदेत कवितेच्या माध्यमातून बरसले आहेत. राम मंदिराच्या प्रस्तातावर आज चर्चा झाली. सर्वपक्षीय खासदारांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनीही त्यांचं मत मांडलं. ओघवत्या काव्यत्मक शैलीत अमोल कोल्हेंनी त्यांचं भाषण केलं. अवघ्या साडेसात मिनिटांच्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा जनतेची मने जिंकली आहेत.

राम मंदिराचं निर्माण ही एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेत योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मी अभिनंदन करेन. देशाची ही गौरवशाली परंपरा राहिली आहे की धर्मात राजकारण आणि राजकारणात धर्म आला नाही पाहिजे. कारण, जागतिक इतिहासानुसार धार्मिक कट्टरता राष्ट्राला नुकसान निर्माण करते. धार्मिक उदारता आणि वैश्विकता राष्ट्राला मानवतेच्या उंचीवर पोहोचवते. आणि मला हाच हिंदू धर्मातील उदारता, सहिष्णूता आणि वैश्विकतामुळे वंदनीय आहे”, असं अमोल कोल्हे सुरुवातीला उत्स्फूर्तपणे म्हणाले.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

“मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे. मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून रयतेचं राज्य स्वराज्य निर्माण केलं. मी त्या महाराष्ट्रातून येतो, ज्या महाराष्ट्रात चंद्रभागेच्या तिरी अठरा पगड जातीच्या वारकऱ्यांचा, वैष्णवांचा मेळा जमतो. आणि तो एकाच पांडुरंगाच्या चरणी लीन येतो. मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रातून महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी रुढीच्या, परंपरांच्या आणि कर्मकांडाच्या चौकटी झुगारून मानवतेला अधिष्ठान मिळवून दिलं”, असं अमोल कोल्हे भर संसदेत मराठी भाषेत बोलले.

हेही वाचा >> चांदनी चौकातून : कोल्हेंची कविता

“राम मंदिर देशाच्या आस्थेचा विषय आहेत. भक्तीचा विषय आहेत. भक्तीमार्गात माध्यम, साधन आणि साध्य या तीन गोष्टींना फार महत्त्व असतं. पूजा, आरती हे माध्यम झालं. मूर्ती किंवा फोटो फ्रेम ठेवतो ते साधन झालं आणि परत्म्याशी संवाद म्हणजे साध्य होय. त्यामुळे राम मंदिर साध्य नाही, साधन आहे. त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या आदर्शांचं आपल्या जीवनात अनुसरण करणं, आणि आचरण करणं हे साध्य होईल. प्रभू राम एकवचनी आणि एकपत्नी होते. एकवचनी प्रभू श्रीरामांचे आपण भक्त म्हणवतो, मग देशात २ कोटी रोजगार निर्माण करू या आश्वासनाचं काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढवू या आश्वासनाचं काय झालं? २०२२ पर्यंत प्रत्येकाला पक्की घरे मिळतील या वचनांचं काय झालं, याचा अंतःपूर्ण विचार करावा लागेल”, असं म्हणत अमोल कोल्हेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

हाच का तो समान न्याय?

“भगवान श्रीराम समान न्याय देणारे होते. परंतु, कलियुगात विरोधकांवर ईडीसारख्या यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो. परंतु, हेच जेव्हा सत्ताधाऱ्यांमध्ये सामील होतात तेव्हा त्यांच्यावरील आरोप पुसले जातात. हा समान न्याय आहे का?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“मी नारायण गावातून येतो. हे गाव तमाशा पंढरी म्हणून ओळखलं जातं. तमाशा हे लोकनाट्य असून महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. तमाशात वगनाट्य होतात. हे वगनाट्य व्यंगात्मक रुपातून होतं. व्यंगात्मक दृष्टीने वगनाट्य लिहिणाऱ्या आमच्या येथील एका लेखकाने कलियुगातील रामायण लिहिलं आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.

कलियुगातील रामायणाविषयी अमोल कोल्हे म्हणाले, रामायणात कांचनमृगाचं आमिष दाखवून सीतेचं अपहरण केलं होतं, कलियुगात ईडी, सीबीआयचा धाक दाखवून निवडणूक चिन्ह, पक्ष आणि नेत्यांचं हरण होतं. सीता माता अशोकवन रडत होती, पण कलियुगात लोकशाही रडत आहे. मी विचारलं मग यावर उपाय काय? तर रामायणात हनुमानाने समुद्र पार करून सीता मातेला रामाची अंगठी दिली होती. आणि सीता मातेचं धाडस उंचावलं होतं. आजही तेच होऊ शकतं. ते म्हणाले त्या हनुमानाकडून प्रेरणा देऊन सामान्य जनतेला खोट्या प्रोपागंडाचा समुद्र पार करून मतदानाची अंगठी द्यावी लागेल आणि लोकशाहीचं धाडस बांधावं लागेल”, अशी कहाणी अमोल कोल्हेंनी सांगितली.

मी जय श्रीराम नक्कीच म्हणेन, पण त्याआधी

“कलियुगात एक असं आदर्श उदाहारण आहे ज्यांनी माणूस धर्मासाठी नाही तर धर्म माणसासाठी तयार झाला आहे, हे सिद्ध केलं आहे. ते आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे मी जय श्रीराम नक्कीच म्हणेन, पण त्याआधी जय शिवराय म्हणेन. कारण छत्रपती शिवाजी महाराजच होते, ज्यांच्यामुळे अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय सुरक्षित राहिली. ज्यांनी राज्याभिषेकाच्या वेळी राजदंड स्वतःच्या हाती ठेवून धर्मसत्ता राजसत्तेच्यावर नाही तर खांद्यावर ठेवून लोकांसाठी राबवली पाहिजे हा विचार त्यांनी मांडला”, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

तसंच, यानंतर त्यांनी रामलल्ला तो आगए पर रामराज्य कब आयेगा ही कविताही सादर केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हेंनी लोकसभेत एक कविता सादर केली होती. ती कविताही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अमोल कोल्हेंचं भाषण त्यांचे विरोधकही मनापासून ऐकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.