बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग ४५ टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यांना वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटलमधून बेंगळुरूच्या एअर फोर्स कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्याबद्दल विचार सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे.

“ग्रुप कॅप्टन वरुण सिंग वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये लाइफ सपोर्टवर आहेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत,” असे संसदेत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

तामिळनाडूच्या कुन्नूर येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका आणि सशस्त्र दलाच्या ११ जवानांना प्राण गमवावे लागले. या हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते. त्यापैकी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव व्यक्ती बचावले आहेत.

वरुण सिंग यांचा शौर्य चक्राने करण्यात आला होता सन्मान..

१२ ऑक्टोबर २०२ रोजी फ्लाइट कंट्रोल सिस्टीम  आणि प्रेशरायझेशन सिस्टममधील (लाइफ सपोर्ट एनवायरमेंट कंट्रोल सिस्टीम) मोठ्या सुधारणांनंतर, ते त्यांच्या बेसपासून दूर एलसीएमध्ये सिस्टम चेक सॉर्टी उडवत होते. यावेळी जास्त उंचीवर गेल्यानंतर कॉकपिटचा दबाव कमी झाला. सिंग यांनी लगेच परिस्थिती ओळखली आणि लँडिंगसाठी कमी उंचीवर उतरण्यास सुरुवात केली. पण खाली उतरताना, फ्लाइट कंट्रोल सिस्टीम अयशस्वी झाली आणि त्यांनी विमानावरील संपूर्ण नियंत्रण गमावले. अशा अत्यंत जीवघेण्या परिस्थितीत शारीरिक आणि मानसिक तणावात असतानाही, सिंग यांनी संयम राखत विमानावर नियंत्रण मिळवले होते. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी स्वातंत्र्यदिनी त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा – IAF helicopter crash: कोण आहेत अपघातात बचावलेले एकमेव ग्रूप कॅप्टन वरुण सिंग, जाणून घ्या