पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान अटारी-वाघा सीमेवरुन रात्री ९.२० च्या सुमारास भारतात दाखल झाले. पाकिस्तानी रेंजर्स आणि बीएसएफमध्ये कागदपत्राच्या प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर अभिनंदन यांनी भारतीय सीमेत प्रवेश केला. दोन दिवस ते पाकिस्तानाच्या ताब्यात होते.

अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे समजल्यापासून सर्व देशवासियांच्या जीवाला घोर लागला होता. शुक्रवारीही भारताकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने अनेकांची धाकधुक वाढली होती. अखेर रात्री नऊच्या सुमारास तो ऐतिहासिक क्षण आला व अभिनंदन यांनी भारतात प्रवेश केला. सर्व देशवासियांसाठी तो क्षण खूप भावूक होता.

अभिनंदन यांना अमृतसरहून आता विशेष विमानाने दिल्लीला नेण्यात येईल. अभिनंदन यांचे मिग-२१ विमान कोसळून ते जखमी झाले होते. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल असे एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी सांगितले. अभिनंदन परतल्याचा आनंद आहे असे त्यांनी सांगितले.

बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले व ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. अभिनंदन यांचे विमान कोसळण्याआधी त्यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ लढाऊ विमान पाडले. भारताने चहूबाजूंनी निर्माण केलेल्या दबावानंतर पाकिस्तानने गुरुवारी अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्याचा निर्णय जाहीर केला.

संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं.  अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.

हे आमचे शांततेसाठीचे पहिले पाऊल आहे, असा कांगावा पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात अमेरिका, सौदी अरेबियासह काही देशांनी आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानला ही सुटका करणे भाग पडल्याचे स्पष्ट होत आहे. भारतानेही ही सुटका म्हणजे तडजोड नसून जोवर अतिरेक्यांवर ठोस कारवाई करीत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण भारताने त्यांची विमानं परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. यानंतर भारताने त्यांच्या सुटकेसाठी सर्वोपतरी प्रयत्न सुरु केले होते. अखेर भारतीय कुटनीतीला यश आलं आणि पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका कऱण्याचा निर्णय घेतला.