भारत चीन सीमेवरच्या वायुदलाच्या तळावर अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर, Su-30 MKI आणि मिग २९ या लढाऊ विमानांनी कसून सराव केला. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत असं भारतीय वायुदलाच्या विंग कमांडरने म्हटलं आहे. आमचा जोश कायमच हाय असणार आहे असंही त्याने म्हटलं आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीन या दोन देशांमध्ये जो संघर्ष झाला त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर चीनविरोधात देशात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अशात कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख आणि लेहमध्ये जाऊन जवानांची भेट घेतली आणि त्यांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम केलं.

या सगळ्या परिस्थितीत भारत चीन सीमेजवळ भारतीय वायुदलाने मिग २९, अपाचे हेलिकॉप्टर आणि Su-30 MKI  या घातक लढाऊ विमानांचा कसून सराव केला.  भारत आणि चीनमध्ये जो तणाव निर्माण झाला आहे तो पाहता आमच्याशी आगळीक केली तर तसेच प्रत्युत्तर मिळेल असाच इशारा एक प्रकारे भारताने दिला आहे.

भारतीय वायुदलाच्या विंग कमांडकरने काय म्हटलं आहे?

“आमचा जोश कायमच उंचावलेला आहे. प्रत्येक हवाई योद्ध्याला योग्य प्रकारे संकटाचा किंवा कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. आम्ही आकाशाला गवसणी घालून कोणत्याही संकटाचा, आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत.एवढंच नाही भारतीय वायुदल लढा देण्यासाठी सज्ज आहे. कोणतीही मोहिम, कोणतंही स्पेशल ऑपरेशन यासाठी आम्ही कायमच तयार आहोत. ”

भारत चीन सीमेजवळ असेलल्या एअर बेसवर असलेल्या विंग कमांडरने दिलेला हा संदेश बोलका आहे. चीनने किंवा कोणत्याही शत्रूने जर आगळीक केली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा सूप्त इशाराच या शब्दांमध्ये दिसतो आहे. आगामी काळात चीनने कुरापती काढल्या तर तसंच उत्तर चीनला मिळू शकतं. याच अनुषंगाने आज घातक अपाचे हेलिकॉप्टर, मिग २९ आणि इतर लढाऊ विमानांचा कसून सराव करण्यात आला.