Who is Rajasthan IAS Officer Archana Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजस्थानमधील बंसवाडा येथे झालेल्या जाहीर सभेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर लगेचच राजस्थानच्या माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण विभागाच्या सचिवपदावरून वरिष्ठ आयएएस अधिकारी अर्चना सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. २५ सप्टेंबर रोजी राजस्थान सरकारने आदेश काढून प्रशासकीय कारणांसाठी अर्चना सिंह यांना पदावरून दूर केल्याचे म्हटले. मात्र सभेतील गडबड यासाठी जबाबदार असल्याची चर्चा राजस्थानच्या राजकीय वर्तुळात केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंसवाडा जिल्ह्यातील नापला गावात २५ सप्टेंबर रोजी एक जाहीर सभा पार पडली. या सभेत तांत्रिक गडबड झाली. यासाठी अर्चना सिंह यांना जबाबदार धरण्यात आल्याचे कळते. दरम्यान अर्चना सिंह यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न द इंडियन एक्सप्रेसने केला. मात्र त्यांनी यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. तसेच राजस्थानच्या कार्मिक विभागानेही या प्रकरणावर अद्याप भाष्य केले नाही.
२००९ च्या बॅचच्या अधिकारी अर्चना सिंह आता नव्या पोस्टिंगची वाट पाहत आहेत. सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, जयपूर आणि दिल्लीतील अधिकारी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान उद्भवलेल्या समस्येवर असमाधानी आहेत.
तांत्रिक समस्या काय होती?
पंतप्रधान मोदी जाहीर सभेसाठी मंचावर आल्यानंतर तांत्रिक समस्येमुळे लाईव्ह व्हिडीओ प्रणाली जवळपास १० मिनिटे बंद पडली. तसेच पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधत असताना तीही प्रणाली काही वेळेसाठी बंद पडली होती. पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यात राजस्थानमध्ये १.२२ लाख कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले होते.
कोण आहेत आयएएस अर्चना सिंह?
अर्चना सिंह या २००९ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांना राजस्थान कॅडर मिळाले होते. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून बीएससी आणि एमएससीची पदवी घेतली होती. अर्चना सिंह यांनी यापूर्वी राजस्थानच्या अनेक विभागात काम केले आहे.