दोन दिवसांपासून एका आयएएस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून नेटिझन्समध्ये नाराजीची भावना असल्याचं पाहायला मिळालं होतं. या व्हिडीओमध्ये संबंधित आयएएस अधिकारी एका ट्रल चालकाशी असभ्य भाषेत बोलत असल्याचं दिसत होतं. यावरून टीका होऊ लागल्यानंतर या जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारावर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरणही आलं आहे.

नेमकं काय घडलं?

दोन दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशच्या शाजापूरचा असून इथले जिल्हाधिकारी किशोर कन्याल हे एका बैठकीत असभ्य भाषेत बोलल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही बैठक दोन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या ट्रकचालकांची होती. या बैठकीत एक ट्रकचालक जिल्हाधिकाऱ्यांशी हुज्जत घालू लागल्यानंतर “तुम्हारी औकात क्या है”, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर ट्रकचालकानं “यही तो लडाई है की हमारी कोई औकात नहीं है”, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर कन्याल व मध्य प्रदेश सरकारवरही मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली. परिणामी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तातडीने कन्याल यांची शाजापूरच्या जिल्हाधिकारीपदावरून उचलबांगडी केली आहे. त्यांच्याजागी नरसिंहपूरचे जिल्हाधिकारी रिजू बाफना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कन्याल यांना उपसचिवपदी नियुक्ती देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण

यावर विरोधकांकडूनही सरकारवर टीका करण्यात आली. अखेर किशोर कन्याल यांच्याकडून या प्रकारावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “ट्रक ड्रायव्हर्ससोबत बैठक झाली. आमचा हा हेतू होता की त्यांनी कुणीही कायदा व सुव्यवस्था हाती घेऊ नये. पण त्यातला एक व्यक्ती सातत्याने हे म्हणत होता की जर ३ तारखेपर्यंत आमच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर मी काहीही करू शकतो. कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतो. त्यावर मला राग आला होता. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की कायदा व सुव्यवस्था राखणं ही आमची जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही”, असं स्पष्टीकरण कन्याल यांनी दिलं आहे.