|| संतोष सावंत
त्या बेटावर लहान-मोठय़ा अनेक नद्या होत्या. घनदाट जंगले होती. जैवविविधतेची समृद्धता होती. फुला-फळांनी लगडलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती येथे होत्या. पशू-पक्ष्यांच्या अनेक प्रजाती होत्या. खळखळ वाहणारे नसíगक झरे होते. याच निसर्गरम्य बेटावर एका अज्ञात स्थळी होते ‘भारत’ हे संशोधन केंद्र. जगभरातील वैज्ञानिक येथे जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी एकत्रितरीत्या काम करत होते. एका वरिष्ठ भारतीय शास्त्रज्ञाने अशा प्रकारच्या केंद्राची कल्पना सर्वप्रथम मांडल्यानेच याला ‘भारत’ असे नाव देण्यात आले होते.
सायंकाळची वेळ होती. बेटावरचे वातावरण नेहमीप्रमाणेच अत्यंत नेत्रसुखद होते. भारताचे जेष्ठ वैज्ञानिक तेंडुलकर जेव्हा या केंद्रात पोहोचले, तेव्हा अमेरिकेचे मॅकग्रा, पाकिस्तानचे अक्रम, श्रीलंकेचे जयसूर्या, दक्षिण आफ्रिकेचे ऱ्होड्स, न्यूझीलंडचे व्हेटोरी असे देशोदेशीचे वैज्ञानिक त्यांची वाट पाहात होते. त्यांनी थेट विषयालाच हात घातला, ‘‘सध्या इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. दर चार वर्षांनी एकदा हा थरार अनुभवायला मिळतो. त्यामुळे जगभरातील क्रिकेटचे चाहते याची आतुरतेने वाट पाहात असतात. रोमहर्षक लढतींची अपेक्षा बाळगून असलेल्या या चाहत्यांना विविध देशांतील संघ आपल्या दर्जेदार खेळाने आनंद देत आहेत. पण या आनंदावर विरजण घालत आहे तो निसर्ग.. अवेळी पाऊस.. आजवर चार महत्त्वाचे सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. असेच सुरू राहिले तर विश्वचषक जिंकणार कोण, हे सहभागी संघांचा खेळ निश्चित करणार नाही तर पाऊसच करेल.’’
‘‘हा पाऊस..’’ तेंडुलकर बोलायचे थांबले, कारण अक्रम यांनी हात वर केला होता.
‘‘आपण जे सांगत आहात ते सर्वानाच माहीत आहे, पण या प्रकरणात वैज्ञानिक म्हणून आपली नेमकी काय भूमिका असणार आहे?’’ अक्रम यांनी आपल्या मनातील शंका बोलून दाखवली. मॅक्ग्रा यांनीही याला मान हलवून संमती दिली. ‘‘भारतात क्रिकेट हा धर्म आहे. पगाराच्या दिवशी भारतीय जेवढा आनंदी असतो, ना तेवढाच तो भारताचा सामना असतो त्या दिवशीही असतो. त्याचे सुख-दु:ख सारेच क्रिकेटशी निगडित आहे. रसभंग करणाऱ्या या पावसामुळे भारतीय नाराज झाले आहेत,’’ असे तेंडुलकर बोलत होते आणि सर्व लक्षपूर्वक ऐकत होते.
‘‘सर, थोडे अधिक उलगडून सांगता का?’’ व्हेटोरींनी विनंती केली. ‘‘ज्याप्रमाणे भारतात क्रिकेट हे जीवन आहे, त्याचप्रमाणे आपल्या सर्वासाठीच पाणी हे जीवन आहे ..आणि आज ते धोक्यात आलेले आहे. पृथ्वीवरील पिण्यायोग्य पाण्याचा साठा झपाटय़ाने कमी होत आहे. मानवाने आपल्या स्वार्थी आणि स्वकेंद्रित वर्तनाने पर्यावरणाचा समतोल बिघडवून टाकला आहे, यामुळे नसíगक आपत्तींचे प्रमाण वाढत चालले आहे. निसर्गराजा लहरी बनला आहे. कुठे वर्षांनुवष्रे पाऊसच न पडल्याने दुष्काळ ही समस्या आहे तर कुठे अतिवृष्टी आणि पूर!’’
‘‘आमच्या केपटाऊन या शहराला ११ फेब्रुवारी २०१८ रोजी जगातील पहिले पिण्यायोग्य पाणीविरहित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.’’ ऱ्होड्स यांनी आपली खंत व्यक्त केली. ‘‘साओ पावलो, बीजिंग, कैरो अशी जगातील अनेक शहरे याच दिशेने वाटचाल करत आहेत,’’ अशी आपली माहिती जयसूर्या यांनी जोडली.
‘‘एकीकडे नको असलेल्या ठिकाणी नको तेवढा पाऊस आणि दुसरीकडे जीवनच धोक्यात आलेल्या ठिकाणी पावसाचा मागमूसच नाही. अशी विदारक परिस्थिती आहे. केदार जाधवचा व्हिडीओ या संदर्भातील उल्लेखनीय उदाहरण आहे,’’ अशा शब्दांत अक्रम यांनी समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले. ‘‘हेच दुष्टचक्र भेदण्याची महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आलेली आहे. या कामात आपल्याला जगभरातून मदत मिळणार आहे.
आगामी विश्वचषकाच्या आधी आपण हे काम पूर्ण करायचे आहे. या आपल्या बेटावरच आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर उपलब्ध आहे. गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची!’’ असे स्पष्ट करून तेंडुलकरांनी विषय संपवला. सर्वाच्याच चेहऱ्यावर आता क्रिकेट.. पर्यायाने पाणी, पर्यायाने जीवन वाचवण्याचा निर्धार स्पष्ट दिसत होता.