|| ऋषिकेश बामणे
विश्वचषक म्हटला की सर्वाच्या अंगी देशभक्ती संचारते. आपापल्या संघाला विजयी करण्यासाठी खेळाडूही जिवापाड मेहनत घेतात. मात्र काही खेळाडूंचा जन्म एका देशात व नागरिकत्व दुसऱ्या देशाचे अशी परिस्थिती आहे. मग आपल्याच जन्मदेशाविरुद्ध क्रिकेटच्या मैदानावर त्यांना उतरावे लागते. जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीचे पांग फेडणाऱ्या आणि कारकीर्दीतील पहिला विश्वचषक खेळणाऱ्या अशाच काही ताऱ्यांचा घेतलेला हा आढावा..
कॉलिन मुन्रो
- संघ : न्यूझीलंड
- जन्मस्थान : दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंडचा धडाकेबाज सलामीवीर कॉलिन मुन्रोने अल्पावधीतच ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील बहुतांश विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. न्यूझीलंडतर्फे ट्वेन्टी-२०मध्ये सर्वात जलद अर्धशतक आणि सर्वप्रथम तीन ट्वेन्टी-२० शतके झळकावणाऱ्या मुन्रोचा १९८७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे जन्म झाला. परंतु वडिलांच्या व्यवसायामुळे सहपरिवार न्यूझीलंडला स्थायिक झालेल्या मुन्रोने तेथीलच नागरिकत्व स्वीकारून २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
बेन स्टोक्स
- संघ : इंग्लंड
- जन्मस्थान : न्यूझीलंड
सध्याच्या घडीला विश्वातील सवरेत्कृष्ट अष्टपैलू म्हणून लोकप्रिय असलेला २८ वर्षीय बेन स्टोक्स हा मूळचा न्यूझीलंडचा आहे. वडील अँड्रय़ू स्टोक्स यांची इंग्लंडच्या वोकिंग टाऊन रग्बी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर स्टोक्स कुटुंबीय इंग्लंडला स्थायिक झाले. २०११मध्ये एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या स्टोक्सने यंदाच्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत सामनावीर पुरस्कार मिळवला. तसेच २०१७च्या ‘आयपीएल’मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटकडून खेळताना त्याने सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही पटकावला आहे.
जोफ्रा आर्चर
- संघ : इंग्लंड
- जन्मस्थान : वेस्ट इंडिज
२०१८च्या बिग बॅश प्रीमियर लीगमध्ये जेव्हा सर्व क्रीडाप्रेमींनी होबार्ट हरिकेन्सच्या २४ वर्षीय कृष्णवर्णीय गोलंदाजाला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील भल्याभल्या फलंदाजांना गुंडाळताना पाहिले, तेव्हा हा हिरा वेस्ट इंडिजला कुठून गवसला, हाच प्रश्न क्रिकेटजगातत चर्चेत होता. मात्र जोफ्रा मूळचा वेस्ट इंडियन असला तरी त्याने इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले आहे, हे माहीत पडल्यावर तमाम इंग्लंडवासीयांनी या खेळाडूला संघात सहभागी करण्यासाठी जोर धरला. अवघ्या तीन सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आर्चरला विश्वचषकाची संधी मिळाली. आर्चरचे वडील चिओके हे इंग्लंडचे असले तरी जोफ्राने २०१४ मध्ये वेस्ट इंडिजच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रतिनिधित्व केले होते.
इश सोधी
- संघ : न्यूझीलंड
- जन्मस्थान : भारत
फिरकीपटू इंद्रबीर सिंग सोधी ऊर्फ इश सोधी सध्याच्या न्यूझीलंड संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. १९९२ मध्ये लुधियाना, पंजाब येथे जन्मलेला सोधी १९९६ मध्ये परिवारासह दक्षिण ऑकलंड येथे स्थायिक झाला. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सोधी २०१६ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताविरुद्धच्या कामगिरीने प्रकाशझोतात आला.
उस्मान ख्वाजा
- संघ : ऑस्ट्रेलिया
- जन्मस्थान : पाकिस्तान
वयाच्या ३२ व्या वर्षी कारकीर्दीतील पहिला विश्वचषक खेळणारा उस्मान ख्वाजाचा जन्म पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे झाला. परंतु १९९२ मध्ये ख्वाजा कुटुंबीय ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले व त्यानंतर २०११च्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारा ख्वाजा हा पहिला मुस्लीम क्रिकेटपटू ठरला. मात्र क्रिकेटकडे वळण्यापूर्वी त्याने न्यू साऊथ वेल्सच्या विद्यापीठातून वैमानिकाचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.