इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा अखेरचा साखळी सामना आज

यजमान इंग्लंड आणि गतउपविजेते न्यूझीलंड यांचा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अखेरचा सामना बुधवारी होणार आहे. हा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल आणि गमावल्यास अन्य सामन्यांच्या निकालासह काही समीकरणांवर अवलंबून राहावे लागेल.

उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे चेस्टर ली स्ट्रीट येथील लढतीत इंग्लंडचा संघ पराभूत झाल्यास पाकिस्तानचा संघ बांगलादेशवरील विजयासह उपांत्य फेरी गाठू शकेल.

इंग्लंडने भारताचा ३१ धावांनी पराभव करून त्यांची विजयी घोडदौड रोखली होती. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंडचा आत्मविश्वास उंचावला आहे. कारण श्रीलंका आणि गतविजेते ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धचे आधीचे दोन सामने त्यांनी गमावले होते. २०१५च्या विश्वचषकामध्ये साखळीतच आव्हान संपुष्टात आलेल्या इंग्लंडने त्यानंतर कात टाकली आहे. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाकडून पत्करलेल्या पराभवानंतर विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक आहे. त्यांच्या खात्यावर ११ गुण जमा असल्यामुळे पराभवानंतरही त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहू शकतात.

  • इंग्लंडची फलंदाजीची फळी मजबूत आहे. बेन स्टोक्स (आठ सामन्यांत ३७० धावा), जॉनी बेअरस्टो (आठ सामन्यांत ३५६ धावा), जेसन रॉय (चार सामन्यांत २८१ धावा), ईऑन मॉर्गन (सात सामन्यांत २७५ धावा) आणि जोस बटलर (सात सामन्यांत २४२ धावा) या फलंदाजांवर त्यांची प्रमुख भिस्त आहे.
  • भारताविरुद्धच्या सामन्यात बेअरस्टो (१११) आणि दुखापतीतून सावरलेल्या रॉय (६६) यांनी १६० धावांची दमदार सलामी नोंदवली होती.
  • स्टोक्सने (७९) सलग तिसरे अर्धशतक साकारली. त्यामुळे इंग्लंडने ७ बाद ३३७ धावा उभारल्या. जो रूटच्या खात्यावर आठ सामन्यांत ४७६ धावा आहेत. याचप्रमाणे इंग्लंडकडे गोलंदाजीची फळीसुद्धा समतोल आहे.
  • जोफ्रा आर्चर (आठ सामन्यांत १६ बळी) आणि मार्क वूड (आठ सामन्यांत १३ बळी) यांच्यावर त्यांची मदार असली तरी ख्रिस वोक्स आणि लियाम प्लंकेटसुद्धा आपली उपयुक्तता सिद्ध करीत आहेत.

विल्यम्सन, बोल्टवर मदार

न्यूझीलंडच्या फलंदाजीची मदार कर्णधार केन विल्यम्सनवर आणि गोलंदाजीच्या माऱ्याचे नेतृत्व डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट करीत आहे. विल्यम्सनने सातत्यपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय घडवताना एकूण ४५४ धावा केल्या आहेत. अनुभवी रॉस टेलरनेही एकूण २३३ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कॉलिन मुन्रोला वगळण्यात आले होते, तर सलामीवीर मार्टिन गप्टिलला सहा डावांत फक्त ८५ धावा करता आल्या आहेत. गोलंदाजीत लॉकी फग्र्युसनने सात सामन्यांत १७ बळी मिळवत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे, तर बोल्टच्या खात्यावर १३ बळी आहेत.