२०१९ विश्वचषकाचा आपला पहिला सामना खेळणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिका सारख्या बलाढ्य संघाला चांगलंच झुंजवलं आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना, शाकीब अल हसन आणि मुश्फिकुर रहीमच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने ३३० धावांचा टप्पा गाठला. वन-डे आणि विश्वचषक इतिहासातली बांगलादेशची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. शाकीबने तिसऱ्या विकेटसाठी मुश्फिकुरसोबत १४२ धावांची भागीदारीही केली. शाकीबने ७५ धावा केल्या.
यानंतर गोलंदाजीदरम्यान शाकीबने आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्क्रमचा त्रिफळा उडवत त्याला माघारी धाडलं. यादरम्यान शाकीबने अनोखी विक्रमी कामगिरी करत, शाहीद आफ्रिदी-सनथ जयसूर्या यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं. सर्वात कमी वन-डे सामन्यांमध्ये २५० बळी आणि ५ हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शाकीब पहिल्या स्थानावर पोहचला आहे.
सर्वात कमी वन-डे सामन्यांमध्ये २५० बळी आणि ५ हजार धावांचा टप्पा गाठणारे खेळाडू –
शाकीब अल-हसन – १९९ सामने
अब्दुल रझाक – २५८ सामने
शाहीद आफ्रिदी – २७३ सामने
जॅक कॅलिस – २९६ सामने
सनथ जयसूर्या – ३०४
अवश्य वाचा – Cricket World Cup 2019 : बांगलादेशकडून वन-डे क्रिकेटमध्ये विक्रमी धावसंख्येची नोंद