Donald Trump’s Economic Advisor Kevin Hassett Tries To Threaten India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक सल्लागाराने इशारा दिला आहे की, जर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवली नाही, तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष भारतीय आयातीवरील दंडात्मक टॅरिफबाबतची आपली भूमिका मागे घेणार नाहीत. अमेरिकेच्या राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे संचालक केविन हॅसेट यांनी भारतासोबतच्या व्यापार वाटाघाटी “जटिल” असल्याचे म्हटले आहे. त्यांनी, भारत अमेरिकन उत्पादनांसाठी बाजारपेठा न उघडण्याचा “हट्टीपणा” करत असल्याचा आरोप केला आहे.
“जर भारताने माघार घेतली नाही तर मला वाटत नाही की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांची टॅरिफबाबतची भूमिका बदलतील,” असे केविन हॅसेट म्हणाले.
अमेरिकेने २७ ऑगस्ट रोजी भारतीय वस्तूंवरील टॅरिफ तब्बल ५० टक्के केले, जे ब्राझील वगळता इतर कोणत्याही देशासाठी सर्वाधिक आहे. यामध्ये भारताच्या रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवरील २५ टक्के अतिरिक्त टॅरिफचा समावेश आहे.
हॅसेट म्हणाले की, “भारतासोबतच्या व्यापार वाटाघाटी गुंतागुंतीच्या होत्या. भारत आमच्या उत्पादनांसाठी त्यांची बाजारपेठ न उघडण्याबाबत हट्टीपणा करत आहे.”
भारत-अमेरिका व्यापार चर्चांची तुलना मॅरेथॉनशी करत हॅसेट म्हणाले की, चर्चा यशस्वी होण्यासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे आणि भारत आणि अमेरिका अंतिम टप्प्यावर पोहोचण्याआधी त्यातील चढ-उतार स्वीकारावे लागतील.
“व्यापार चर्चा करताना एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना शिकायला मिळते, ती म्हणजे आपण नेहमी दूरदृष्टी ठेवली पाहिजे आणि हे ओळखले पाहिजे की अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी चढ-उतार येतच”, असे त्यांनी सांगितले.
हॅसेट यांच्या या वक्तव्यापूर्वी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनीही याबाबत भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, “भारतावरील टॅरिफ भारत केवळ रशियन तेल खरेदी करत असल्यामुळे नाही तर चालू व्यापार कराराच्या चर्चेच्या प्रदीर्घ स्वरूपामुळे देखील आहेत.”
“मला वाटले होते की मे किंवा जूनमध्ये अमेरिका-भारत करार होईल. अमेरिकेशी व्यापार करार करणाऱ्यांमध्ये भारत पहिल्या काही दैशांपैकी असेल, परंतु त्यांनी, एकप्रकारे, आम्हाला झुलवत ठेवले”, असे बेसेंट यांनी फॉक्स बिझनेसला सांगितले होते.
स्कॉट बेसेंट यांनी असाही दावा केला होता की, वाटाघाटी दरम्यान भारत असहकार्य करत होता. हे एक अतिशय गुंतागुंतीचे प्रकरण आहे.
“मला वाटते की भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मला वाटते की शेवटी आपण एकत्र येऊ”, असे त्यांनी पुढे म्हटले.