Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क (टॅरिफ) लादलं आहे. या अतिरिक्त आयातशुल्काचा अनेक देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरही तब्बल ५० टक्के टॅरिफ लादलं आहे. एवढंच नाही तर भारत रशियाकडून खजिन तेल आयात करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला. मात्र, ट्रम्प यांच्या दबावाला भारताने जुमानलं नाही.
या सर्व परिस्थितीत अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफचा फटका भारताला बसत असल्याची परिस्थिती आता दिसून येत आहे. आंध्र प्रदेशातील कोळंबी निर्यातीत २५ हजार कोटींचा तोटा झाल्याचा अंदाज असून ५० टक्के निर्यात ऑर्डरही रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. तसेच निर्यात होणाऱ्या २००० कंटेनरवर तब्बल ६०० कोटींच्या कराचा बोजा पडल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे अनेक कोळंबी व्यावसायिकांना फटका बसत असून या संकटाचा सामना करणाऱ्या व्यावसायिकांना पाठिंबा आणि मदत देण्याचं आवाहन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारकडे केलं आहे. जीएसटीमध्ये सवलत आणि राज्यातील सर्व उत्पादकांना विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी मुख्यमंत्री नायडू यांनी केली आहे. या शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर योग्य तो निर्णय घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
तसेच मुख्यमंत्री नायडू यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांना या मागण्यासंदर्भात पत्र देखील लिहिली आहेत. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी अर्थमंत्र्यांना जीएसटी आणि आर्थिक सवलतींसह आदी मागण्या केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिलं की देशाच्या कोळंबी निर्यातीपैकी ८० टक्के आणि सागरी निर्यातीपैकी ३४ टक्के आंध्र प्रदेशचा वाटा आहे. ज्याची निर्यात दरवर्षी सुमारे २१,२४६ कोटी रुपयांची आहे. सुमारे २.५ लाख शेतकरी कुटुंबे आणि संबंधित क्षेत्रांवर अवलंबून असलेले ३० लाख लोक अडचणीत आहेत. अमेरिकेच्या शुल्काचा कोळंबी निर्यातीवर सर्वाधिक परिणाम झाल्याचंही मुख्यमंत्री नायडू यांनी म्हटलं आहे.