पीटीआय, इस्लामाबाद : नॅशनल असेम्ब्लीत बहुमत गमावले असले तरी आपण पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार नाही, असे संकेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी दिले. रविवारी होणाऱ्या अविश्वासदर्शक ठरावाला आपण सामोरे जाऊ, असे त्यांनी ठामपणे सांगितले. देशाला उद्देशून दूरचित्रवाणीवरून केलेल्या भाषणात ६९ वर्षांचे खान यांनी त्यांचे आघाडी सरकार उलथून पाडणाऱ्या एका विदेशी राष्ट्राच्या कारस्थानाचा ‘पुरावा’ देणारे एक ‘धमकीचे पत्र’ दाखवले. या धमकीमागे अमेरिकेचा हात असल्याचेही ते ‘चुकून’ बोलून गेले.
या पत्रातील तपशील आपण ज्येष्ठ पत्रकार, आपल्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि लष्करप्रमुखांना कळवल्याचे इम्रान यांनी सांगितले. आपल्याला हटवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय कट’ असल्याचा दावा करताना इम्रान यांनी हे पत्र सार्वजनिकरीत्या जाहीर केले. ‘आमचे धोरण अमेरिकाविरोधी, युरोपविरम्रोधी किंवा भारतविरोधीही नाही. ऑगस्ट २०१९ मध्ये भारताने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेऊन आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्यानंतर ते भारतविरोधी बनले’, असे सांगताना, काश्मीरबाबतचा वाद हा दोन देशांमधील मोठा मुद्दा असल्याचे खान यांनी नमूद केले. ‘अविश्वासदर्शक ठराव सादर होण्यापूर्वीच, तो मांडला जाणार असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला होता. याचाच अर्थ, विरोधक त्यांच्या संपर्कात होते. हे पत्र माझ्या विरोधात होते, सरकारच्या विरोधात नव्हते’, असेही खान म्हणाले.
इम्रान खान यांची गच्छंती अटळ
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची ’बुडत्याचा पाय खोलात’ अशी राजकीय अवस्था झाली आहे. पाकिस्तानी संसदेत ३ एप्रिलला होणाऱ्या अविश्वासदर्शक ठरावावरील मतदानासाठी इम्रान यांच्या विरोधकांनी पुरेसे संख्याबळ गोळा केले आहे. त्यामुळे हा ठराव मंजूर होऊन इम्रान यांची निश्चित गच्छंती होण्याची शक्यता बळावली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत ३४२ सदस्यसंख्या असलेल्या या कनिष्ठ सभागृहात पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या सरकारवरील अविश्वास ठराव मंजुरीसाठी १७२ सदस्यांचे ठरावाच्या बाजूने मतदान होणे गरजेचे आहे. या ठरावावर सभागृहात वादळी चर्चा सुरू आहे. रविवारी यावर मतदान होईल. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीने बुधवापर्यंत आपल्या बाजूने १९६ सदस्य जमवले असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांचे वृत्त आहे. इम्रान यांनी गुरुवारी राष्ट्राला उद्देशून भाषण केले, अशी माहिती व प्रसारण विभागाचे मंत्री फवाद हुसेन यांनी ट्वीटद्वारे दिली. राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठकही इम्रान यांनी बोलावली आहे. यात नागरी आणि लष्करी उच्चाधिकाऱ्यांचा समावेश आहे. बुधवारी लष्करप्रमुख जावेद बाजवा यांची इम्रान यांनी भेट घेतल्यानंतर या समितीची बैठक बोलावली आहे.
विरोधी आघाडीचे नेते शेहबाज शरीफ?
अविश्वास ठराव मंजूर होऊन, इम्रान यांना पदत्याग करावा लागल्यास विरोधी आघाडीने नवाज शरीफ यांचे बंधू शेहबाज शरीफ यांचे आगामी आघाडी सरकारचे नेते म्हणून निवड करण्याचे नियोजन केले आहे. शेहबाज इम्रान यांच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांतील अपयश अधोरेखित करणारे भाषण सभागृहात करून, अविश्वास ठरावावरील चर्चेला तोंड फोडतील.
इम्रान लष्कराचा पाठिंबा मागणार?
तसेच इम्रान यांच्या पक्षाचे मित्रपक्ष मुत्ताहिद कौमी मूव्हमेंट पाकिस्तान व बलुचिस्तान आवामी पार्टी यांनीही इम्रान यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भडकल्याने इम्रान खान सरकारवर सामान्य जनता प्रचंड नाराज आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्या पक्षाचेच काही संसद सदस्यही इम्रान यांच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हतबल इम्रान पुन्हा लष्कराचा पाठिंबा मागण्याची शक्यता आहे.