लाहोर : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दसकलमी कार्यक्रम जाहीर केला. लाहोर येथील मिनार-ए-पाकिस्तान येथे रविवारी पहाटे पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाची भव्य सभा झाली. पाकिस्तानला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे ना योजना आहे ना तशी इच्छा अशी टीका त्यांनी केली.
वारंवार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाणे टाळण्यासाठी परदेशस्थ पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, निर्यातदारांना प्रोत्साहन दिले जाईल असे ते म्हणाले. करसंकलन आणि निर्यात वाढवण्यासाठी काही कठोर उपायांची गरज आहे असे ते म्हणाले. देशातील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल आणि तारण योजनेचे पुनरुज्जीवन केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्याबरोबरच पर्यटन क्षेत्राला चालना देणे, खनिज क्षेत्रातून महसूल वाढवणे, चीनच्या सहकार्याने कृषी उत्पादकता वाढवणे असे उपाय केले जातील असेही इम्रान खान यांनी सांगितले.