अमेरिकेत गोळीबाराचे सत्र सुरुच आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडो शहरातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यानेच हा गोळीबार केला. गोळीबारात जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे. शाळेतील कर्मचारी किंवा शिक्षक गोळीबारात जखमी झाल्यासंबंधी माहिती मिळालेली नाही असे डगलस काऊंटीचे शेरीफ टोनी स्परलॉक यांनी दिली.
या गोळीबारा प्रकरणी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. दोन जण एसटीईएम शाळेत आले. शाळेत आतमध्ये गेल्यानंतर दोन वेगवेगळया ठिकाणी त्यांनी गोळीबार केला अशी माहिती शेरीफ यांनी दिली. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक बंदूक ताब्यात घेतली आहे. एसटीईएम शाळेमध्ये १८०० विद्यार्थी शिक्षण घेतात.
१९९९ साली कोलमबाईनमध्ये दोन सशस्त्र युवकांनी १२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाची हत्या केली होती. त्यावेळी अमेरिकेच्या इतिहासातील ही भीषण घटना होती. शाळेत गोळीबार करणारे दोन संशयित तपास यंत्रणांच्या रडारवर नव्हते. ही अत्यंत भयानक घटना आहे. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करु असे स्परलॉक यांनी सांगितले. अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत.