संपुर्ण देशात करोनाचा हाहाकार सुरु आहे. अनेकजण या आजाराचा सामना करत आहेत. तर अनेकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात काही निर्बंधासह लॉकडाउन करण्यात आला आहे. तर नागरिकांनी करोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम  पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र राजकीय मंडळीचं करोनाचे नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहे. तेलंगणात पोट निवडणुकीदरम्यान १५ शिक्षक कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला तर शेकडो जणांना करोनाची लागण झाली आहे. असाच प्रकार मध्य प्रदेशात देखील समोर आला आहे. दमोहमधील पोटनिवडणूक लोकांसाठी प्राणघातक ठरली आहे.

निवडणुका पार पाडण्यासाठी दमोह जिल्ह्यातील ८०० शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती. यापैकी २०० शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण आणि मतदान संपल्यानंतर करोनाने गाठले. तर ड्युटीवर असलेल्या कमीतकमी १७ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये शिक्षक, राजकारणी कार्यकर्ते आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबानी सरकारवर रोष व्यक्त केला आहे.

“निवडणुकांमुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं”, करोनामुळे पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा आक्रोश

दमोह येथील ५८ वर्षीय सरकारी शिक्षक, ब्रजलाल अहिरवार यांनाही पोटनिवडणुकीवर तैनात करण्यात आले होते. त्यांचे करोनामुळे निधन झाले. त्यांचा २५ वर्षांचा अभियंता मुलगा अजय रोहित विचारात पडला आहे. की जर त्याने आपल्या वडिलांना निवडणुकीच्या ड्युटीवर जाण्यापासून रोखले असेल तर काय झाले असते? रोहित म्हणाला, ‘माझ्या वडिलांची इच्छा होती की विधानसभा पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात यावी, परंतु पीपीई किट मिळाल्यामुळे कोविड होऊ शकत नाही, असा त्यांचा विश्वास होता. दोन दिवसांनी ते परत आले. त्यांना ताप आला आणि ५ मे रोजी जिल्हा रुग्णालयात त्यांचे निधन झाले. दुसर्‍याच दिवशी, त्यांची ५१ वर्षीय पत्नी प्यारीबाई यांचाही करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

जीव गमावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला मिळणार नुकसान भरपाई

पोटनिवडणूक कर्तव्यावर सामील झाल्यानंतर करोना व्हायरसने मृत्यू झालेल्या १७ शिक्षकांची दमोह प्रशासनाने यादी केली आहे. जिल्हाधिकारी कृष्णा चैतन्य म्हणाले, “आतापर्यंत आम्हाला २४ शिक्षकांच्या नातेवाईकांनी अर्ज दिले आहेत. ज्यांनी ड्युटी नंतर करोनामुळे आपले प्राण गमावले. यापैकी सहाजण पोटनिवडणुकीच्या कर्तव्यात सक्रियपणे सहभागी होते तर इतर सबंधीत कामात गुंतले होते. आतापर्यंत आम्ही १७ शिक्षकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे ओळखले आहे. या शिक्षकांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणाऱ्या अन्य अर्जांची आम्ही पडताळणी करीत आहोत.”

कॉंग्रेसचे आमदार राहुल लोधी यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे दमोहमधील पोटनिवडणूक झाली होती. कॉंग्रेसच्या २६ आमदारांमध्ये लोधी यांचा समावेश होता. त्यांनी पक्ष बदला. “ते म्हणाले, जेव्हा भाजपाने कमलनाथ यांचे सरकार पाडले तेव्हा मी पक्ष बदलला.” पोटनिवडणुकीपूर्वी दामोहमध्ये भाजपा आणि कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ राजकारणी रोड शो आणि जाहीर सभांना संबोधत होते. त्यामुळे करोना पसरल्याचे बोलले जात आहे.

“निवडणुकांमुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेलंगणामधील प्राथमिक शाळेतील शिक्षिका संध्या यांचे करोनामुळे १७ एप्रिल निधन झाले. त्यांनी निवडणूक केंद्रावर ड्युटी केली होती. त्यानंतर त्यांना करोनाची लागण झाली. नागार्जुनसागर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिक्षकांना निवडणूक ड्युटीवर बोलावण्यात आले होते. त्यांना ८ वर्षांची मुलगी आहे. राजकारण आणि निवडणुकांमुळे जीवन उध्वस्त झाले, असा आरोप संध्या यांचे पती कम्ममपति मोहन राव यांनी  केला आहे. यामुळे आतापर्यत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने स्वत: या प्रकरणाची दखल घेतली आहे. राज्याचा हा “अपराध, निष्काळजीपणा” आहे. ज्यामुळे निवडणुकीच्या वेळी १५ शिक्षकांचा मृत्यू झाला. तर शेकडोजण कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत.