इम्फाळ : मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यात चकमकीत आसाम रायफल्सने १० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जिल्ह्यातील डोंगराळ भागात भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ, राजधानी इम्फाळपासून १३० किमी अंतरावर ही चकमक झाली. गुरुवारी सकाळीही ही कारवाई सुरू होती आणि ती संपल्यानंतरच अधिक माहिती दिली जाईल, असे कोहिमा येथील संरक्षण दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.
चंदेल जिल्ह्यातील खेंगजोय तहसीलमधील न्यू समताल गावाजवळ सशस्त्र व्यक्तींच्या हालचालींबद्दल विशिष्ट गुप्त माहितीवरून आसाम रायफल्स युनिटने १४ मे रोजी कारवाई सुरू केली. या वेळी संशयित व्यक्तींनी सैन्यावर गोळीबार केला, ज्याला जवानांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. यानंतर झालेल्या गोळीबारात १० जणांना ठार करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याची माहिती लष्कराच्या पूर्व कमांडने बुधवारी ‘एक्स’वरील संदेशात दिली.