नवी दिल्ली : काँग्रेसच्या मागील वर्षाच्या कर परताव्यामध्ये विसंगती आढळल्यामुळे प्राप्तिकर खात्याने लादलेल्या २१० कोटींच्या दंडाविरोधात पक्षानेकेलेला अर्ज प्राप्तिकर अपील लवादाने शुक्रवारी फेटाळला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या प्रकरणी सर्व कायदेशीर पर्याय तपासून पाहत आहोत आणि लवादाच्या निकालाविरोधात लवकरच उच्च न्यायालयात दाद मागू असे पक्षाकडून सांगण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१० कोटींच्या दंडाविरोधात काँग्रेसने दाखल केलेला अपील अर्ज लवादाने फेटाळला आहे. त्याबद्दल काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पक्षासमोरील पर्यायांची माहिती दिली. भाजप सरकारने जाणीवपूर्वक सार्वत्रिक निवडणुकीची वेळ साधली आहे असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस निधी गोठवण्याचा प्राप्तिकर लवादाचा निर्णय हा लोकशाहीवरील हल्ला आहे आणि तो अगदी निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>निवडणूक रोखेप्रकरणी सोमवारी सुनावणी; न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न केल्याबद्दल स्टेट बँकेविरोधातही अवमान याचिका दाखल

‘‘प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या खात्यामधून २७० कोटींचा निधी गोठवला असताना किंवा काढून घेतला असताना अशा परिस्थितीत निष्पक्ष वातावरणात निवडणुका होण्याची अपेक्षा कशी काय करता येईल’’, असा प्रश्न माकन यांनी विचारला. लवादाच्या आदेशाची पुष्टी करताना पक्षाच्या कायदा विभागाचे प्रमुख विवेक तनखा यांनी आरोप केला की, लवादाने यासंबंधी स्वत:च्याच जुन्या आदेशांचेही पालन केलेले नाही.

तनखा म्हणाले की, ‘‘आम्ही प्राप्तिकर अपील लवादाच्या आदेशाने निराश झालो आहोत. आम्ही लवकरच उच्च न्यायालयात जाणार आहोत. त्यांनी दंडाची २० टक्के रक्कम भरण्याची सवलत देण्याच्या आपल्याच जुन्या आदेशांचे पालन केलेले नाही, तेही सार्वत्रिक निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या एका राष्ट्रीय पक्षाच्या बाबतीत’’.

प्राप्तिकर खात्याने विविध बँकांमधील काँग्रेसच्या खात्यातून एकूण ६५ कोटी रुपये काढून घेतले आहेत आणि निधीपैकी २०५ कोटी रुपये गोठवले आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे.

द्रमुकचे व्हीसीके, एमडीएमकेबरोबर जागावाटप

चेन्नई : तमिळनाडूमध्ये द्रमुकने लोकसभा निवडणुकीसाठी ‘व्हीसीके’ आणि ‘एमडीएमके’ या दोन पक्षांबरोबर शुक्रवारी जागावाटप निश्चित केले. त्यानुसार दोन्ही पक्षांबरोबर २०१९च्याच पद्धतीने आघाडी करण्यात आली आहे. ‘व्हीसीके’ आणि ‘एमडीएमके’ या दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन जागा सोडण्यात आल्या. ‘एमडीएमके’ त्यांच्याकडे सध्या असलेल्या चिदंबरम आणि विल्लुपुरम या दोन जागा लढवणार आहे.

भविष्यात पेपर न फुटण्याची हमी, काँग्रेसचा दावा

नवी दिल्ली : परीक्षांच्या पेपरफुटीपासून स्वातंत्र्य देण्याची आपली हमी ही केवळ गुन्हेगारांना शिक्षा देण्यापुरती नाही तर भविष्यात असे गुन्हे घडण्यापासून थांबवण्याची आहे असा दावा काँग्रेस पक्षाने शुक्रवारी केला. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, परीक्षा प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये सर्वोच्च प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता यांची खात्री करण्यासाठी नवीन कायदा करण्याचे वचन काँग्रेसने दिले आहे.

आप’चा लोकसभा प्रचार सुरूनवी दिल्ली

‘आप’चे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. ‘‘संसद में भी केजरीवाल, तो दिल्ली होगी और खुशहाल’’ अशी घोषणा पक्षातर्फे देण्यात आली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये अपेक्षित असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘आप’ दिल्ली, हरियाणा आणि गुजरातमध्ये काँग्रेसबरोबर तर पंजाबमध्ये स्वबळावर लढा देत आहे.