भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अधिक सुदृढ करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले असून  गुन्हेगारांचे सहजपणे हस्तांतरण करण्याबाबत आणि नवीन लवचीक व्हिसा धोरण लागू करण्याबाबतच्या करारांवर सोमवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि बांगलादेशचे गृहमंत्री मोहिउद्दिन खान आलमगिर यांनी याबाबतच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
गुन्हे हस्तांतर करारामुळे बांगलादेशच्या तुरुंगात असलेल्या उल्फाचा महासचिव अनूप चेटीआ आणि इतर हव्या असलेल्या गुन्हेगारांच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच दोन्ही देशांमधील नागरिकांना सहजपणे व्हिसा मिळावा यासाठी दोन्ही देशांनी व्हिसा प्रक्रिया अधिक सोपी आणि लवचीक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी ढाक्का येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
दोन्ही देशांदरम्यान झालेल्या गुन्हेगार हस्तांतर करारामुळे खून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असलेले तसेच इतर गंभीर गुन्ह्य़ांतील आरोपींच्या हस्तांतरण शक्य होणार आहे. मात्र अधिक गंभीर नसलेल्या गुन्हेगारांच्या हस्तांतरणाचा यामध्ये समावेश नसून संभावित हस्तांतरीत गुन्हेगारांची यादी जाहीर करणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.