पीटीआय, नवी दिल्ली
अफगाणिस्तानशी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा भाग म्हणून भारताने काबूलमधील आपल्या ‘टेक्निकल मिशन’ला दूतावासाचा दर्जा देण्याची घोषणा केली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे समकक्ष अमीर खान मुत्ताकी यांनी दीड आठवड्यांपूर्वी याबाबत चर्चा केली होती.
ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर भारताने काबूलमधील आपल्या दूतावासातून आपले अधिकारी मागे घेतले होते. जून २०२२ मध्ये, भारताने ‘तांत्रिक पथक’ तैनात करून अफगाणिस्तानच्या राजधानीत आपली राजनैतिक उपस्थिती पुन्हा स्थापित केली. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मुत्ताकी भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी भारतीय परराष्ट्रमंत्र्यांशी व्यापक चर्चा केल्यानंतर काबूलमधील ‘टेक्निकल मिशन’ला दूतावासाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
काबूलमधील भारतीय दूतावास अफगाणिस्तानच्या व्यापक विकास, मानवतावादी मदत आणि क्षमता-निर्मिती उपक्रमांमध्ये भारताचे योगदान आणखी वाढवेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तान कोणत्याही घटकांना भारताच्या हितांविरुद्ध त्यांच्या भूमीचा वापर करू देणार नाही, असे आश्वासन मुत्ताकी यांनी भारताला दिले.