चीन-भारत यांच्यातील सीमावादावर सामोपचाराने तोडगा काढण्याची भारताची प्रामाणिक इच्छा आहे असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. चीनने मतभेद दूर करण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.
आयटीबीपी बटालियनच्या छावणीचे उद्घाटन केल्यानंतर राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारत-चीन सीमेबाबत काही आकलनात्मक मतभेद आहेत. चीनच्या मते सीमा वेगळी आहे आमच्या मते सीमा वेगळी आहे. आम्ही सीमा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. चीननेही त्यासाठी पुढे यावे. भारताला सर्व प्रश्न शांततेने सोडवण्याची इच्छा आहे.
भारताच्या कुठल्याही प्रादेशिक आकांक्षा नाहीत व आपले सरकार आकलनात्मक मतभेद दूर करून सीमा वाद संपवण्याच्या मताचे आहे. आम्ही विस्तारवादी नाही. भारताचा इतिहासही विस्तारवादाचा नाही. आम्ही कुठल्या देशावर आक्रमण केलेले नाही, आम्ही शांततेचे पुजारी आहोत. चीनने हे लक्षात घ्यावे, आम्हाला सगळे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायचे आहेत.
गृहमंत्री म्हणाले की, आमच्या मंत्रालयाने इंडो तिबेटियन सीमा दलास नवीन ३५ छावण्या मंजूर केल्या आहेत. त्यातील २२ लवकरच सुरू होतील व १३ छावण्यांचे काम चालू आहे. आटीबीपीला डिसेंबरमध्ये हवाई सेवा देण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने ३४ रस्ते मंजूर केले असून त्यातील २७ रस्त्यांचे काम प्राधान्य क्रमाने चालू आहे. १२३ मोबाईव फोन टॉवर्स उभारण्यास मंजुरी दिली असून आयटीबीपीची संपर्क क्षमता त्यामुळे वाढेल.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीविषयी त्यांनी सांगितले की, आम्हाला सर्वच देशांशी चांगले संबंध हवे आहेत. विशेष करून शेजारी देशांशी चांगले संबंध हवे आहेत. सर्व जग हेच कुटुंब आहे असे आम्ही मानतो, बांगलोदेश, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान हे देशही या कुटुंबाचे घटक आहेत. त्यामुळे सर्वाशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘भारत-चीन सीमावादावर सामोपचाराने तोडगा काढण्याची इच्छा’
चीन-भारत यांच्यातील सीमावादावर सामोपचाराने तोडगा काढण्याची भारताची प्रामाणिक इच्छा आहे असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
First published on: 29-01-2015 at 12:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India as honest intentions for solving border dispute with china says rajnath singh