Ban On Pakistan Ships In Indian Water: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता भारताने शनिवारी पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार, पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्देशानुसार भारताच्या ध्वजधारी जहाजांनाही पाकिस्तानातील बंदरांवर डॉकिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या मते, “भारतीय मालमत्ता, मालवाहू जहाजे आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी” ही कारवाई करण्यात आली आहे. हे निर्देश तात्काळ लागू झाले असून, पुढील सूचना येईपर्यंत ते कायम राहतील. अशी माहिती निर्देशांमध्ये देण्यात आली आहे.

राष्ट्रीय हितासाठी पाकिस्तानवर जहाज बंदी

“हे पाऊल उचलण्यामागील उद्दिष्ट राष्ट्रीय हितासाठी सर्वात योग्य पद्धतीने भारतीय व्यापारी सागरी जहाजाच्या विकासाला चालना देणे आणि कार्यक्षम देखभाल निश्चित करणे आहे,” असे मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

“पाकिस्तानचा ध्वज असलेल्या जहाजाला कोणत्याही भारतीय बंदरात येण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि भारतीय ध्वज असलेल्या जहाजाला पाकिस्तानच्या कोणत्याही बंदरात जाण्याची परवानगी मिळणार नाही,” असेही आदेशात पुढे म्हटले आहे.

या आदेशातून कोणाला सूट द्यायची की नाही, याचा निर्णय सूट मागणाऱ्याची चौकशी आणि प्रकरणानुसार घेतला जाणार आहे.

पाकिस्तानवर आयात बंदी

दरम्यान भारताने काल पाकिस्तानबरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

भारताच्या या निर्णयाचा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. या बंदीच्या निर्णयाअंतर्गत पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही उत्पादनाच्या आयातीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानमधून एखादी वस्तू आयात होणारी असो किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्या कोणत्याही देशातून पाकिस्तानी वस्तू भारतात आयात होणार असेल तर त्यावरही बंदी असणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आक्रमक

पहलगाम हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून, भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. अटारी सीमा बंद केली असून, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले आहेत. याचबरोबर अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल आणि एक्स हँडल्सवर भारतात बंदी घालण्याची कारवाई सुरू केली आहे. दुसरीकडे पाकिस्ताननेही भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांची हवाई हद्द बंद केली आहे. याचबरोबर पाकिस्तानी राजकीय नेते भारताविरोधात चिथावनीखोर विधाने करत आहेत.

Live Updates