काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ६ डिसेंबरला दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावण्यात आली होती. पण, ही बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
काँग्रेसमधील नेत्यानं ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या माहितीनुसार, एम. के स्टॅलिन तामिळनाडूत आलेल्या मिचौंक चक्रीवादळामुळे प्रवास करू शकणार नाहीत. नितीश कुमार यांची प्रकृती ठिक नाही. तसेच, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी नियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इंडिया आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करून बैठकीचं आयोजन करण्याचा काँग्रेस पुन्हा प्रयत्न करणार आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बैठकीला उपस्थित राहणार होते. पण, आत ठाकरेंनी विमानचं तिकीट रद्द केलं आहे. तर, आम आदमी पक्षाकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नाही, असंही काँग्रेस नेत्यानं सांगितलं.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील पराभवानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोणातून काँग्रेसनं ६ डिसेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत पुढील रणनिती आणि लोकसभेच्या संभाव्य जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता होती.