Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान भारत सरकारने मंगळवारी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांचे एक्स अकाउंट ब्लॉक केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरबद्दल खोट्या माहिती आणि चुकीच्या बातम्या परवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी भारत सरकारने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. या सर्व युट्यूब चॅनलचे सर्व मिळून ६३ दशलक्ष सबस्क्रायबर आहेत. दरम्यान या चॅनल्सवरून प्रक्षोभक आणि संवेदनशील कंटेन्ट प्रसारित केल्या प्रकरणी भारतात या चॅनलवर बंदी घालण्यात आली आहे.
भारतात जर कोणी पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे एक्स खाते पाहण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना कायदेशीररित्या @KhawajaMAsi यांच्यावर भारतात बंदी घालण्यात आल्याचा संदेश दिसून येत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आसिफ यांनी अनेक धक्कादायक विधाने आणि दावे केले आहेत. पहलगाम येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी बहुतेक जण हे पर्यटक होते. दरम्यान सोमवारी पाकिस्तानी मंत्र्यांनी दावा केला आहे की जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करी हल्ला करणार हे निश्चित असल्याचे म्हटले आहे. पहालगाम हल्ल्यानंतर भारतात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे, तसेच या हल्ल्याचा बदला घेतला जावा अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने २३ एप्रिल रोजी काही महत्त्वाचे निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. एवढंच नाही तर सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे.
याबरोबरच जम्मू-काश्मीर सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील भागातील तब्बल ५० पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान, बंद करण्यात आलेल्या ५० पर्यटन स्थळांमध्ये आणि ट्रेकिंग ट्रेल्समध्ये गुरेझ व्हॅली (Gurez Valley), दूधपथरी, वेरीनाग, बंगस व्हॅली आणि युसमार्ग सारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा समावेश आहे.