उत्तर प्रदेशमध्ये तरी इंडिया आघाडीचे एकमताने जागावाटप झाले आहे. अखिलेश यादव आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाचे घोडे अडले होते. अखिलेश यादव यांनी काँग्रेसला केवळ ११ जागा सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काँग्रेसकडून वाढीव जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र अखेर १७ जागांवर समंती झाली आहे. तर उर्वरीत ६३ जागा समाजवादी पक्ष आणि त्यांच्या घटक पक्षाच्या नावावर आल्या आहेत.
काँग्रेसच्या वाट्याला रायबरेली, अमेठी, कानपूर शहर, फतेहपूर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझीयाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी आणि देवरिया हे मतदारसंघ मिळाले आहेत. बुधवारी सकाळी अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे संकेत दिले होते. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि सपा आघाडी करणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
समाजवादीच्या ‘सायकल’ला जागावाटपाचा अडथळा; उत्तर प्रदेशात अखिलेश भाजपसमोर कसे टिकणार?
माध्यमांशी बोलत असताना अखिलेश यादव म्हणाले की, लवकरच आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होईल. आमच्यात कोणताही वाद नाही. त्यामुळे लवकरच सर्व गोष्टी सर्वांसमोर येतील.
दोन दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याबाबत समाजवादी पक्षाने भूमिका मांडली होती. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपानंतरच यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर करू, असे सपाकडून सांगण्यात आले होते.
समाजवादी पक्षाने राज्यातील लोकसभेच्या १७ पेक्षा जास्त जागा देण्यास नकार दिला. सुरुवातीला तर १२ जागाच देऊ केल्या होत्या. मात्र जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाने विरोधकांच्या इंडिया आघाडीची साथ सोडली. त्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील जागांवर भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीपुढे आव्हान कसे उभे करणार, असा प्रश्न समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यापुढे निर्माण झाला. यासाठी काँग्रेसबरोबर आघाडीसाठी ते प्रयत्न करत आहेत.