Buying Russian Oil Is Blood Money, Says Donald Trump Adviser Peter Navarro: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी सोमवारीही भारतविरोधी टीका सुरूच ठेवली आहे. याचबरोबर त्यांच्या पोस्टची फॅक्ट चेकिंग केल्याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला लक्ष्य केले. सोमवारी पुन्हा भारतावर टीका करताना नवारो यांनी रशियाकडून भारताने केलेल्या तेल खरेदीला ‘रक्तरंजित पैसे’ म्हटले आहे. ते म्हणाले की युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत नव्हता.

नवारो यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले की, “सत्य हे आहे की युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत नव्हता. हा रक्तरंजित पैसा आहे आणि लोक मरत आहेत.”

यापूर्वी, एक्सने नवारो यांच्या भारताबाबतच्या दाव्याची पोस्ट खोटी असल्याचे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नमूद केले होते. यानंतर संतापलेल्या नवारो यांनी, “भारत सरकारची प्रचार यंत्रणा पूर्ण ताकदीने काम करत आहे”, अशी पोस्ट केली होती.

यापूर्वी, एलॉन मस्क यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने फॅक्ट चेकिंग केली होती आणि नावारो यांच्या भारतविरोधी पोस्टला “ढोंग” असल्याचे म्हटले होते. नावारो यांनी भारतावर रशियन तेल आयातीतून “नफा कमावण्याचा” आरोप केला होता, भारताच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरणांवर, विशेषतः रशियाशी असलेल्या संबंधांवर, टीकांची मालिका सुरू ठेवली होती.

अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने दोन दिवसांपूर्वी एक लेख प्रकाशित केला होता. या लेखात असे म्हटले आहे की, ट्रम्प सरकार भारताशी संबंध सुधारण्यासाठी परस्परविरोधी प्रयत्न करत आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या या लेखात असा दावा करण्यात आला होता की, अमेरिकेने भारताबद्दल वापरलेल्या चिथावणीखोर भाषेमुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक कटू होत चालले आहेत.

या लेखावर टीका करताना, पीटर नवारो यांनी एक्सवर पोस्ट केली की, “फॅक्ट: भारत सर्वाधिक टॅरिफ लादतो ज्यामुळे अमेरिकेचे रोजगार कमी होतात. भारत केवळ नफा मिळवण्यासाठी रशियन तेल खरेदी करत आहे. यामुळे रशियाच्या युद्धयंत्रणेला चालना मिळत आहे. तसेच युक्रेनियन आणि रशियन नागरिक मरत आहेत. अमेरिकन करदाते जास्त पैसे देतात. भारत सत्य हाताळू शकत नाही. वॉशिंग्टन पोस्ट अमेरिकन डाव्या विचारसरणीच्या बनावट बातम्या चालवते.”

एक्सने केले फॅक्ट चेक

नवारो यांच्या या पोस्टवर, एक्सने एका कम्युनिटी नोटसह फॅक्ट चेकिंग केली आणि लिहिले, “भारत रशियाकडून केवळ नफा कमावण्यासाठी नाही तर ऊर्जा सुरक्षेसाठी तेल खरेदी करतो. ते व्यापार निर्बंधांचे उल्लंघन करत नाही. जरी भारतावर टॅरिफ असले तरी, त्यांचा अमेरिकेसोबत मोठा व्यापार आहे. अमेरिका स्वतः रशियाकडून काही वस्तू आयात करत आहे, हे एक प्रकारचे ढोंग आहे.”