पीटीआय, भावनगर

इतर देशांवरील अवलंबित्व हा देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. गुजरातमधील भावनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी स्वावलंबनावर भर दिला. सेमीकंडक्टर चिपपासून जहाजांपर्यंत सर्व वस्तूंचे स्वदेशात उत्पादन करण्याचे त्यांनी आवाहन केले.

‘समुद्र ते समृद्धी’ या कार्यक्रमाअंतर्गत मोदींनी ३४ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. परावलंबनामुळे देशाला आत्मसन्मानावर तडजोड करावी लागते असा दावा पंतप्रधानांनी यावेळी केला. या परावलंबनाचा सामूहिकरित्या पराभव केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. १४० कोटी भारतीयांचे भविष्य परदेशी शक्तींवर सोडता येऊ शकत नाही, तसेच परदेशावर अवलंबून राहून देशाचा विकास होऊ शकत नाही असे मत मोदी यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सत्ताधारी पक्षाने परवाना राज राबवून आणि जागतिक बाजारपेठेपासून स्वत:ला दूर ठेवून तरुणांची प्रतिभा चिरडून टाकली, असे म्हणत पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली. तत्कालीन सरकारने सातत्याने देशाच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर सहा ते सात दशकांनंतरही देशाला हवे ते यश मिळाले नाही असा दावा मोदींनी केला.