भारत आणि चीनने डोकलाममधील सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे. मात्र भारताचा हा दावा चुकीचा असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ‘भारतीय सैन्य डोकलाममधून माघारी परतले आहे. मात्र चिनी सैन्याकडून डोकलाममध्ये गस्त घालण्याचे काम सुरूच राहिल,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. दोन्ही देशांकडून सैन्य मागे घेतले जाणार असल्याचे भारताने जाहीर करताच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून हे विधान करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २१ ऑगस्टला भारत आणि चीनमधील सीमावाद लवकरच संपुष्टात येईल, असे म्हटले होते. ‘भारत आपल्या शेजारी देशांसोबतचे चांगले संबंध कायम राखू इच्छितो. डोकलाममधील वाद लवकरच संपुष्टात येईल आणि यासाठी चीनकडून सकारात्मक पावले उचलण्यात येतील,’ असे राजनाथ सिंग म्हणाले होते. चिनी सैन्याने १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते ९ या दरम्यान लडाखमधील पँगाँग सरोसर परिसरात दोनदा घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यावेळी दोन्ही देशांच्या सैन्याने एकमेकांवर दगडफेक केली होती. याच पार्श्वभूमीवर बोलताना राजनाथ सिंह यांनी सीमावाद लवकरच संपुष्टात येईल, असे म्हटले होते.

राजनाथ सिंह यांच्या विधानानंतर सात दिवसांमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. मात्र चीनने यावर प्रतिक्रिया देताना, चिनी सैन्याकडून डोकलाम भागात गस्त घालण्याचे काम सुरुच राहिल, असे म्हटले आहे. याशिवाय भारतीय सैन्याने डोकलाममधून माघार घेतल्याचेही म्हटले आहे. डोकलाममधील सैन्याच्या उपस्थितीवरुन चीन आणि भारतामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे.

डोकलाम परिसरातील वर्चस्वावरुन भारत आणि चीनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून वाद पेटला आहे. डोकलाम हा उंच पठाराचा भाग भूतानमध्ये असून भारत, चीन आणि भूतानच्या सीमा जेथे मिळतात, तेथे हा परिसर आहे. सामरिकदृष्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या डोकलामवर चीनने आपला हक्क सांगितला असून यावरुन भूतान आणि चीनमध्ये वाद सुरु आहे. डोकलाम परिसर भूतानमध्ये असल्याने भारताचा त्याच्याशी थेट संबंध नाही. मात्र भारत आणि भूतान यांच्यात संरक्षण करार झाला असून त्यानुसार भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे.

भौगोलिक आणि संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या डोकलाममध्ये चीनचे सैन्य पोहोचताच भूतानने भारताकडे मदत मागितली. डोकलाम हा वादग्रस्त परिसर सिलिगुडी कॉरिडॉर नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या भूभागाजवळ आहे. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली होती. दोन महिन्यांपासून दोन्ही देशांचे सैन्य या परिसरात ठाण मांडून होते. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला होता. ६ जून रोजी चीनने बुलडोझरचा वापर करुन भारतीय बंकर नष्ट केले होते. भारताने यावर आक्षेप घेतला होता. तर चीनने भारताचा दावा फेटाळून लावला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India china doklam standoff issue will withdraw forces but not stop patrolling says chinese foreign ministry
First published on: 28-08-2017 at 14:40 IST