फारशी पूर्वतयारी नसताना आणि उबदार कपडे, शस्त्रास्त्र व निवारा व्यवस्थेचा अभाव असतानाही भारतीय सैन्याने सियाचिन या जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर ताबा मिळवून पाकिस्तानला बेसावध गाठले. लडाखच्या उत्तर आणि ईशान्य भागात, अत्यंत दुर्गम आणि निर्मनुष्य अशा या टापूवर सामरिकदृष्ट्या ताबा मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन मेघदूत’ असे नामकरण केलेल्या या मोहिमेस १३ एप्रिल रोजी ४० वर्षे पूर्ण होतात. जगात सर्वात उंच युद्धभूमीवर झालेली ही पहिलीच लष्करी मोहीम ठरली.

लष्करी मोहिमेची गरज का भासली?

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सूचनेनुसार १९४९ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान आखलेली युद्धबंदी रेषा आणि १९७१ च्या युद्धानंतर सिमला कराराने अमलात आलेली नियंत्रण रेषा नकाशावर ‘एन. जे. ९८४२’च्या संदर्भ बिंदूपर्यंत सीमित होती. ती या बिंदूच्या पुढे आखली न गेल्याने संदिग्धता निर्माण झाली. एन. जे. ९८४२ च्या पलीकडे दोन्ही बाजूंचा भाग कोणत्याही लष्करी कारवाईच्या कक्षेबाहेरचा मानला जात असे. पुढे पाकिस्तान सियाचिनवर आपला हक्क सांगू लागला. गिर्यारोहणासाठी परदेशी गिर्यारोहकांना पाठवू लागला. भारतीय सैन्याने गिर्यारोहण मोहिमा आखल्या. मात्र, त्यास विरोध करीत पाकिस्तानने पॉइंट एन. जे. ९८४२ पासून काराकोरम खिंडीला जोडणाऱ्या रेषेच्या आसपासच्या प्रदेशावर दावा सांगण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ या उत्तुंग क्षेत्रात सैन्य तैनातीचा विचार झाला नव्हता. बदलत्या स्थितीत तो क्रमप्राप्त ठरला. पाकिस्तानी सैन्याने या भागात लष्करी ठाणे उभारण्याची तयारी केल्याचे गुप्तचर अहवाल आले. पाकिस्तानी सैन्याने उत्तुंग क्षेत्रासाठी काही खास सामग्री युरोपातून खरेदी केल्याची माहिती उघड झाली. सियाचिनवर ताबा घेण्यापासून पाकिस्तानला रोखण्यासाठी भारतीय सैन्याने तत्पूर्वीच या क्षेत्रात आपली लष्करी ठाणी प्रस्थापित करण्याचे निश्चित केले. गिर्यारोहणाचा हंगाम सुरू होण्याआधी मोहीम तडीस नेण्यासाठी १९८४ मध्ये ’मेघदूत‘ची आखणी झाली.

Syed Mustafa Kamal compares Karachi with india
“भारत चंद्रावर पोहोचला, कराचीमध्ये मुलं उघड्या गटारात…”, पाकिस्तानच्या खासदाराने संसदेत व्यक्त केली खंत
Why Israel compassion for Hamas war victims cost lives
युद्धग्रस्तांबाबतची सहृदयताच जीवावर बेतली, असे का व्हावे?
Sangli, Kasab, Pakistan,
सांगली : बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानातील कसाबविरुद्ध गुन्हा दाखल
ran chabahar port important for india
विश्लेषण : इराणच्या चाबहार बंदरातून भारताचा व्यापार थेट रशियापर्यंत… चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाला आव्हान?
India-US on Chabahar Port deal
Chabahar Port Agreement: इराणशी सहकार्य करणाऱ्यांना फळं भोगावी लागतील! अमेरिकेची भारताला गर्भित धमकी
Who exactly is Archit Grover of Indian origin
कॅनडात सोन्याची आजवरची सर्वात मोठी फ्लिमी स्टाइल चोरी; अटकेतील भारतीय वंशाचा अर्चित ग्रोव्हर नेमका कोण?
The story of the Balakot airstrike rananiti Balakot and Beyond web series
पुन्हा एकदा गोष्ट बालाकोट हवाई हल्ल्याची…
Autobiography of Ajay Bisaria Ambassador of India to Pakistan History of India Pakistan Relations
भारतीयाने इस्लामाबादेतून पाहिलेला भारत..

सामरिकदृष्ट्या महत्त्व काय?

काराकोरम पर्वत रांगेच्या अलीकडे भारताच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेला तब्बल २३ हजार फूट उंचीवरील अतिशय महत्त्वाचा प्रदेश म्हणजे सियाचिन होय. सियाचिन हिमनदी ७६ किलोमीटर लांब आणि दोन ते आठ किलोमीटर रुंद परिसरात पसरलेली आहे. पाकव्याप्त काश्मीरला हा प्रदेश चीनशी थेट जोडण्यापासून प्रतिबंधित करतो. यामुळे भारतासाठी सामरिकदृष्ट्या हे क्षेत्र महत्त्वाचे आहे. पाकिस्तानव्याप्त गिलगिट आणि बाल्टिस्तान प्रदेशाबरोबर चीनच्या हालचालींवर तेथून नजर ठेवता येते. या क्षेत्रात तापमान उणे ५५ अंशापर्यंत घसरते. हिमस्खलनाचा धोका, वेगवान वारे आणि प्राणघातक उंची यामुळे शारीरिक क्षमतेचा कस लागतो. हवाई मार्ग वगळता दळणवळणाची अन्य व्यवस्था नाही. हिवाळ्यातील सलग काही महिने सियाचिनचा जगाशी संपर्क तुटतो.

कारवाईची तयारी कशी झाली?

भारतीय लष्कराच्या श्रीनगरस्थित १५ कोअर मुख्यालयात उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एल. एम. चिब्बर, कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल पी. एन. हून आणि उत्तर क्षेत्राचे मेजर जनरल अमरजित सिंग अशा काही निवडक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेघदूत मोहिमेची आखणी झाली होती. ब्रिगेडियर विजय चन्ना यांनी त्यावर काम केले. कोणती तुकडी कुठे जाईल, कोणते क्षेत्र ताब्यात घ्यायचे, गस्त कोण, कुठे घालणार हे निश्चित झाले. मोहिमेबद्दल कमालीची गुप्तता बाळगली गेली. अन्य अधिकारी व स्कीइर (बर्फाळ पर्वतीय क्षेत्रात स्कीजने भ्रमंती करणारे) अनभिज्ञ होते. मोहिमेतील आव्हानांच्या दृष्टीने त्यांची पूर्वतयारी नव्हती. त्यांना काही प्रशिक्षण मिळाले नव्हते. मोहिमेत निवड करण्यासाठी तळावरील सविस्तर मुलाखती घेतल्या गेल्या. प्रत्येकाची योग्यता, तंदुरुस्ती व लष्करी प्रशिक्षणाची माहिती घेतली गेली. निवडीत विवाहित अधिकाऱ्यांना वगळून अविवाहितांना प्राधान्य मिळाल्याचे या मोहिमेत सहभागी झालेले काही अधिकारी सांगतात. लेहच्या तळावर उच्च उंचीवरील समस्यांना तोंड देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. अखेरच्या टप्प्यात वैद्यकीय तपासणी, थंड हवामानातील कपडे, बंदुक, प्रत्येकी २० किलो शिधा देऊन अधिकारी-जवानांच्या तुकड्या मार्गस्थ झाल्या.

मोहीम फत्ते कशी झाली?

अल्पावधीत मोहिमेचे नियोजन झाले. मेजर आर. एस. संधू आणि चार कुमाऊँचे कॅप्टन संजय कुलकर्णी यांच्या तुकडीला १३ एप्रिल १९८४ रोजी पहाटेपासून हेलिकॉप्टरने बिलाफोंडला खिंडीपासून तीन किलोमीटर अंतरावर सोडण्यात सुरुवात झाली. दिवसभरात हेलिकॉप्टरने १७ वेळा उड्डाण करीत २९ सैनिकांना तिथे पोहोचवले. चार दिवसांनी चिता आणि एमआय – आठ हेलिकॉप्टरने ३२ वेळा सियालापर्यंत उड्डाण केले. बिलाफोंडला व सियाला या दोन्ही ठिकाणी लष्कराची ठाणी उभारण्यात आली. कॅप्टन पी. व्ही. यादव यांच्या नेतृत्वाखालील तुकडी दुर्गम भूभागावर चार दिवस मार्गक्रमण करीत हिमनदीवर पोहोचली. या तुकडीने नव्याने स्थापन केलेल्या लष्करी ठाण्यांच्या देखभालीचे नियोजन केले. या मोहिमेवर नेमलेल्या १९ कुमाऊँ बटालियनने लक्षणीय कामगिरी केली. संपूर्ण तुकडी सामग्रीचा भार घेऊन आपल्या स्थानापासून हिवाळ्यात पायी झोजिला पार झाली. नोव्हेंबर १९४८ मध्ये झोजिला ताब्यात घेतल्यानंतर हिवाळ्यात सैन्याच्या तुकडीने बर्फाच्छादित खिंंड ओलांडण्याची ही पहिली व एकमेव घटना. या मोहिमेतून संपूर्ण हिमनदी सुरक्षित करण्यात आली. दोन मुख्य खिंडींची नाकेबंदी केल्यामुळे पाकिस्तान सैन्याला धक्का बसला. जूनमध्ये त्याने भारतीय ठाण्यांवर हल्ला चढविला. भारतीय सैन्याने कडवा प्रतिकार करीत तो परतावून लावला. पाकिस्तानचे नुकसान झाले.

आव्हानांची मालिका…

भारतीय सैन्य तुकड्यांना पॅराशुटच्या तंबूत वास्तव्य करावे लागले. तीन महिने अधिकारी-जवानांना कपडेही बदलता आले नाहीत. पायमोजे ओले राहिल्याने बहुतेकांच्या तळपायाला जखमा झाल्या. अत्यंत कठीण, दुर्गम युद्धभूमीवर ताबा मिळवणे, लढणे आणि टिकून राहण्याचे कौशल्य भारतीय सैन्याने मेघदूत मोहिमेतून सिद्ध केले. उच्च पर्वतीय विकारांनी काही जणांचे बळी गेले. पण १३ एप्रिल रोजी सुरू झालेली ही मोहीम कोणत्याही विघ्नाविना जवळपास नियोजित प्रकारे पार पडली. 

पाकिस्तानला चकवा…

काराकोरम पर्वतराजींच्या पलीकडे असलेल्या सियाचिन हिमनदीवर ताबा मिळवण्याची जबाबदारी त्यावेळी पाकिस्तानी लष्करात ब्रिगेडियर असलेले परवेझ मुशर्रफ यांच्या खांद्यावर होती. ‘ऑपरेशन अबाबिल’ नामक मोहीम त्यांनी आखली. १९८४च्या एप्रिल आणि मे महिन्यातच ती पूर्ण करण्याची तयारी पाकिस्तानी लष्कराने चालवली होती. त्याचा सुगावा भारतीय गुप्तहेरांना लागला. अत्यंत प्रतिकूल हवामानातील कपडे घेण्याच्या दृष्टीने भारताने युरोपातील एका कंपनीकडे चाचपणी केली. त्यावेळी पाकिस्तानने त्याच कंपनीकडे तशाच प्रकारच्या सामग्रीची ऑर्डर नोंदवल्याचे भारतीय लष्कराला कळाले आणि त्यांचा संशय पक्का झाला. यासाठी सियाचिनवर चढाईसाठी १३ एप्रिल हा बैसाखीचा दिवस सुनिश्चित करण्यात आला. या दिवशी आणि इतक्या तत्परतेने भारतीय लष्कर मोहीम राबवेल, याची अजिबात कल्पना नसल्याची कबुली पुढे परवेझ मुशर्रफ यांनी एका पुस्तकात दिली.