देशाच्या काही भागांमध्ये करोना संसर्ग वेगाने पसरत असून, करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी जलद व निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांना केले. ‘चाचणी करा, रुग्णशोध घ्या व उपचार करा’ या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला. करोनास्थिती आणि लसीकरणाबाबत मोदी यांनी बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यादरम्यान रुग्णसंख्येने देशवासियांची चिंता वाढवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरपासून ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यासोबतच करोना रुग्णसंख्या १ कोटी १४ लाखांवर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात बुधवारी तब्बल २३ हजार १७१ नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्रात बुधवारी २४ तासांत २३,१७९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ८४ जणांचा मृत्यू झाला. मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यासह राज्यातील सर्वच भागांमध्ये रुग्ण वाढले आहेत. सप्टेंबरनंतर राज्यात प्रथमच इतकी मोठी दैनंदिन रुग्णवाढ नोंदविण्यात आली. राज्यात ११ सप्टेंबरला सर्वाधिक २४,८८६ दैनंदिन रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. मात्र, आता रुग्ण वाढत असून, दिवसभरात मुंबई २३७७, नाशिक शहर १४९०, पुणे शहर २६१२, पिंपरी-चिंचवड १२०६, उर्वरित पुणे जिल्हा ९०६, औरंगाबाद ९७९, नागपूर शहर २६९८, कल्याण-डोंबिवली ६३७, सातारा ३०३, अकोला शहर ३०३, बुलढाणा ५३२, वर्धा ३६० नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या १ लाख ५२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्ह््यात सर्वाधिक ३२,३५९ रुग्ण उपचाराधीन आहेत.

४५ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करा – उद्धव ठाकरे</strong>
करोना लाट रोखण्यासाठी अतिशय कठोर पावले उचलण्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली.

केंद्रीय पथकांनी वेळोवेळी दिलेले सल्ले व मार्गदर्शनाप्रमाणे राज्य करोनाची लढाई लढत आहे. मधल्या काळात तर दिवसाला २ हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती. मात्र, आता काही जिल्ह्याांत ती संख्या खूप वेगाने वाढते आहे. महाराष्ट्र किंवा देशाच्या पश्चिामी भागातील राज्यांत अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली. त्यावर जगातल्या कानाकोपऱ्यातील सर्वच देशांत वैज्ञानिक यासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवून असून या बदलाचा अभ्यास करीत आहेत, असे उत्तर मोदी यांनी दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India daily covid cases surge to 35 1 highest since early december sgy
First published on: 18-03-2021 at 10:13 IST