नवी दिल्ली : २६ निष्पाप पर्यटकांचे त्यांच्या कुटुंबादेखत बळी घेणाऱ्या पाकिस्तान आश्रित दहशतवादाला भारताने मंगळवारी ‘ऑपरेशन सिंदूर’ने चोख प्रत्युत्तर दिले. भारतातील अनेक दहशतवादी कारवायांचे सूत्रधार असलेल्या जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांच्या पाकिस्तानातील नऊ ‘नापाक’ तळ भारतीय सैन्यदलाने अवघ्या २५ मिनिटांत उद्ध्वस्त केले. अतिशय नियोजनबद्ध आणि अचूक माहितीच्या आधारे अचूक लक्ष्यभेद करत भारताने पाकिस्तानाश्रित दहशतवादाचे कंबरडे मोडले आहे.

पाकिस्तानला विरोधीकृतीची अजिबात उसंतही न देता भारतीय सैन्यदलाने केलेल्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत असून ‘ऑपरेशन सिंदूर’ने पहलगाममध्ये ‘सौभाग्य’ गमावलेल्या महिलांना उचित न्याय दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. भांबावलेल्या पाकिस्तानने या हल्ल्याबद्दल भारतावर आगपाखड करत ‘प्रत्युत्तरा’चा इशारा दिला आहे. मात्र, ‘असे कोणतेही दु:साहस पूर्ण क्षमतेने हाणून पाडण्यात येईल’ असे सांगत भारताने पाकिस्तानला दम भरला आहे. ‘आम्ही स्वरक्षणाच्या अधिकाराचा पूर्ण वापर करताना दोन्ही देशांतील परिस्थिती चिघळवण्यासारखे कोणतेही कृत्य केलेले नाही’ असे भारताने अवघ्या जगाला ठासून सांगितले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही या कारवाईच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही. देशातील सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकार आणि सैन्य दलाला पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला असून बुधवारी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील मुझफ्फराबाद, सियालकोट, मुरीदके आदी ठिकाणच्या नऊ दहशतवादी तळांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर १.०५ वाजता हल्ले सुरू करण्यात आले. अतिशय आधुनिक विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा या हल्ल्यात वापर करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानी हवाई दलाच्या रडारवर उमटण्याआधीच या क्षेपणास्त्रांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्व्स्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते झाल्याची तसेच या संपूर्ण मोहिमेची सविस्तर माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी, लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सकाळी १०.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगितले. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे अनेक सबळ पुरावे आंतरराष्ट्रीय समुदायाला दिले होते. पहलगाम हल्ल्याबाबत दोन आठवडे पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण ठिकाणांवर हल्ला करण्यात आल्याचे मिस्राी म्हणाले. या वेळी आपले लष्कर किंवा हवाई दलाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा वा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली नाही, तसेच तेथील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचे टाळून तणाव अधिक चिघळू नये, याची खबरदारी घेण्यात आल्याचे ते म्हणाले. अत्यंत अचूकरीत्या व प्रमाणबद्ध रीतीने करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती देतानाही खबरदारी घेण्यात आली. २६ पर्यटकांची हत्या करून महिलांचे कुंकू पुसणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्याचे काम कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंग यांनी पार पाडले.

‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करून जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या सैन्यदलाचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या जवानांचे साहस, दृढ संकल्प आणि राष्ट्रभक्तीला सलाम… पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाईसाठी सैन्यदल आणि केंद्राला काँग्रेस पक्षाने स्पष्ट शब्दांत पाठिंबा दिला होता. सर्व स्तरातून एकजूट महत्त्वाची आहे.  मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

भारतीय सैन्यदलांनी रात्री इतिहास रचला. दहशतवाद्यांचे तळ आणि अन्य ठिकाणांवर अचूक आणि खबरदारीने कारवाई झाली. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने आपल्या भूमीवर झालेल्या हल्ल्यास प्रतिसादाचा अधिकार वापरला. लक्ष्यभेद करताना एकाही सामान्य नागरिकाला इजा होणार नाही, असे नियोजन केले गेले. – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

‘ऑपरेशन सिंदूर’ नाव पंतप्रधानांकडून?

पाकिस्तानी अतिरेकी तळांवरील या व्यापक कारवाईचे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सांकेतिक नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचविल्याची माहिती सूत्रांनी दिली. पहलगाम हल्ल्यात ठार झालेले हे सर्व पुरूष आणि बहुसंख्य पर्यटक होते. कुंकू पुसले गेलेल्या त्यांच्या अर्धांगिनी या हल्ल्याचा चेहरा बनल्या होत्या. भारतीय संस्कृतीत ‘सिंदूर’ हे विवाहित महिलांशी संबंधित असल्याने हे नाव योग्य मानले गेल्याचे समजते. पंतप्रधान रात्रभर या कारवाईवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी कारवाई यशस्वी झाल्याबद्दल सैन्यदलांचे कौतुक केले. देशासाठी हा क्षण गौरवास्पद असल्याचे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तान सरकारमध्ये गोंधळाची स्थिती

इस्लामाबाद : भारतीय सैन्याने पाकिस्तानस्थित अतिरेकी तळांवर केलेल्या आजवरच्या सर्वांत मोठ्या कारवाईनंतर शहाबाज शरीफ सरकारमध्ये गोंधळाची स्थिती आहे. एकीकडे पंतप्रधान शरीफ हे ‘ऑपरेशन सिंदूर’चा योग्य बदला घेण्याची भाषा करत असताना संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ मात्र तणाव कमी करण्याची भाषा करताना दिसले. भारताच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना शरीफ म्हणाले, की पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हल्ला करणे ही ‘युद्धकृती’ असून शत्रूला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर समर्थ आहे. तर दुसरीकडे भारताला तणाव निवळायला हवा असेल, तर आपलीही तशी तयारी असल्याचे असिफ यांनी ‘ब्लूमबर्ग’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.