Rahul Gandhi Slam PM Modi Over: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यानुसार एच १ बी व्हिसासाठी नवीन अटी लागू करण्यात आल्या असून एच १ बी व्हिसा अर्जासाठी १ लाख डॉलर्स इतकी फी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाचा फटका अमेरिकेतील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी कमकुवत पंतप्रधान म्हटले आहे. पंतप्रधान भारतीयांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावरून ही टीका करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी त्यांची २०१७ साली पंतप्रधानांवर टीका करत केलेली एक्सवरील पोस्ट रिपोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी, “भारताचे पंतप्रधान कमकुवत आहेत,” असे म्हटले होते.

तसेच त्यांनी आता एक नवीन पोस्ट केली आहे, ज्यामध्ये अमेरिकेने एच-१बी बाबत घेतलेल्या निर्णयासंबंधीत लेखाचा स्किनशॉट्स शेअर करत त्यांनी , “मी पुन्हा सांगतो, भारताला कमकुवत पंतप्रधान लाभले आहेत,” असे म्हटले आहे.

अमेरिकेने एच-१बी व्हिसाच्या फीमध्ये प्रचंड वाढ केली आहे, ज्यामुळे परदेशी नागरिकांना नोकरीवर घेणाऱ्या संस्थांना प्रत्येक अर्जासाठी १००,००० डॉलर देणे अनिवार्य झाले आहे. याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम हा अमेरिकेत आयटीमध्ये काम करणाऱ्या भारतीय नागरिकांवर होणार आहे.

तीन वर्षांसाठी वैध असलेल्या आणि एकदा नूतनीकरण करता येणाऱ्या एच-१बी व्हिसाची प्रतिवर्षाची मर्यादा ६५,००० पर्यंत आहे. तर अमेरिकन विद्यापीठांमधील उच्च पदवीधारकांसाठी २०,००० व्हिसा राखीव आहेत. अमेरिकन सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी एकून ए -१बी व्हिसापैकी भारतीयांचा वाटा ७१ टक्के होता. तर त्या खालोखाल चीन ११.७ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमाकांवर होता.

यापूर्वी एच – १बी व्हिसासाठी कंपन्यांना फक्त २१५ डॉलरचे नोंदणी शुल्क आणि ७८० डॉलरचे शुल्क द्यावे लागत होते. पण आता ट्रम्प प्रशासनाने व्हिसासाठी थेट एक लाख डॉलरचे शुल्क निर्धारित केले आहे. यामुळे आयटी कंपन्या आता फक्त महत्त्वाच्या लोकांसाठीच व्हिसा मागू शकतात, असे सांगितले जात आहे. याचा परिणाम आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांना अडचण येऊ सकते.

खरगेंचीही मोदींवर टीका

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगें यांनी देखील पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. “वाढदिवसाच्या कॉलनंतर तुम्हाला मिळालेल्या रिटर्न गिफ्टने भारतीयांना वेदना होत आहे. तुमच्या “अबकी बार, ट्रम्प सरकार” कडून मिळालेलं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट!” असे म्हणत खरगेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अहमदाबाद येथे यांच्याबरोबर त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळात झालेल्या कार्यक्रमाच्या संदर्भात ही टीका केली आहे.

खरगे यांनी व्यापक परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यावरून देखील पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी ट्रम्प भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याबाबत वारंवार केलेले दावे याचा देखील उल्लेख केला आहे.