पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडे सर्जिकल स्ट्राइकशिवाय इतर अनेक पर्याय उपलब्ध असल्याचा इशारा भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रावत यांनी पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमच्या (बॅट) कृत्याचा निषेध केला. बॅटने दोन भारतीय सैनिकांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. यावर रावत म्हणाले, पाकिस्तानला हे युद्ध खूप सोपे वाटते. पण सर्जिकल स्ट्राइकशिवाय आमच्याकडे अनेक प्रभावी पर्याय आणि मार्ग आहेत. आमचे सैन्य क्रूर नाही. आम्हाला शिर जमा करण्याचा छंद नाही. आमचे सैन्य सभ्य आहे, अशा शब्दांत पाकला इशारा दिला.

हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनला जागतिक दहशतवादी घोषित केल्याप्रकरणी रावत म्हणाले, आम्ही वाट पाहू. पाकिस्तान वास्तवात यावर लगाम लावतो की, नाही हे पाहावे लागेल. काश्मीर खोऱ्यात भडकलेला हिंसाचार आणि आंदोलनावरून फुटीरतावाद्यांबरोबर जेव्हा शांतता नांदेल तेव्हाच त्यांच्याबरोबर बोलणी होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले. लष्कर फक्त आपले काम करत आहे. आम्ही शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मी अशा व्यक्तीबरोबर चर्चा करेल जो मला माझ्या टीमवर हल्ला न करण्याची ग्वाही देईल. ज्या दिवशी असं होईल, तेव्हा मी स्वत: चर्चा करेन.

भारतीय सैनिक काश्मिरी युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना चुकीची माहिती देण्यात आली आहे. १२-१३ वर्षांची मुले म्हणतात, आम्हाला बॉम्बर बनायचं आहे. आम्ही अशा युवा नेत्यांचा शोध घेत आहोत ज्यांच्याबरोबर आम्हाला चर्चा करता येईल. लोकांनी हिंसा सोडावी, अशी माझी इच्छा आहे, असे ते म्हणाले. रावत यांनी पुन्हा एकदा मानवी ढालचा उपयोग करणाऱ्या मेजर गोगोई यांचा बचाव केला.