भारत आणि पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी घोषित करून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं की, “सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं कुणाच्याही हिताचं नाही. भारत पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवण्यास उत्सुक आहे. पण पाकिस्ताननं आधी दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करावं. तसेच जम्मू-काश्मीर प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू नये”.
जनरल नरवणे यांच्यापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारताशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले होते की, नियंत्रण रेषेवरील परिस्थिती गेल्या वर्षभरात अतिशय शांततापूर्ण आहे. त्यामुळे पाकिस्तान काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी भारतासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे. पाकिस्तानात झालेल्या सुरक्षा संवादाला संबोधित करताना बाजवा यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. या सुरक्षा संवादात काही आंतरराष्ट्रीय प्रवक्ते देखील सहभागी होते.
जनरल नरवणे हे भारतीय लष्कर प्रमुख पदावरून शनिवारी निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, “जेव्हा तुमचा शेजारील देश अस्थिर असतो. तेव्हा त्याचा फायदा होत नाही. पण शेजारील देश स्थिर असतील तर एक राष्ट्र म्हणून आपण आपोआप सुरक्षित असतो. देशातील लोकं सुरक्षित असतात. आपला पश्चिमेकडील शेजारील देशाला हा तर्क समजेल, अशी आशा आहे. आम्ही त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्यास उत्सुक आहोत, परंतु त्यांनी प्रथम दहशतवादाला पाठिंबा देणं आणि जम्मू-काश्मीरकडे आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचं लक्ष वेधण्याचे प्रयत्न थांबवले पाहिजे.”
गेल्या एक वर्षापासून सीमेवर शस्त्रसंधी घोषित केल्यानं, नियंत्रण रेषा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा खूप फायदा झाला आहे. त्यांचं एकंदरीत जीवनमान सुधारलं आहे, असंही ते म्हणाले. भारत-चीन सीमारेषेवरील तणावाबाबत बोलताना जनरल नरवणे यांनी सांगितलं की, “पूर्व लडाखच्या सीमेवर चीनने ८ हजारावरून ६० हजार इतकं सैन्य वाढवलं आहे. आपणही तितक्याच प्रमाणात सैन्य तैनात केले आहेत. भारतीय लष्कर भविष्यात चिनी लष्कराच्या कोणत्याही युद्धखोर कृतीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे”.