नवी दिल्ली : “वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरकपात करण्याची काँग्रेस पक्ष सातत्याने मागणी करत होता, कारण जनहिताची मागणी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पूर्ण करू शकतात हे त्या पक्षाला माहीत आहे,” अशी टीका भाजपने मंगळवारी केली. या निर्णयामुळे लोक खुश आहेत, असे वाटत असेल तर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक लावावेत, अशी खोचक टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.केंद्र सरकारने २०१७मध्ये ‘जीएसटी’ लागू केल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करत होते. सरकारने २२ सप्टेंबरपासून ‘जीएसटी’ दरकपात करण्याची घोषणा केल्यापासून काँग्रेसचे नेते सातत्याने याकडे जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, “काँग्रेसला श्रेय घ्यायचे असेल तर त्यांनी पंतप्रधानांचे फलक लावून त्यांचे आभार मानावेत,” असा सल्ला पात्रा यांनी दिला. ‘जीएसटी’ सुधारणेमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती कमी होऊन सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे असे पात्रा म्हणाले. ‘जीएसटी’ दरकपातीचा निर्णय राज्यांचा समावेश असलेल्या ‘जीएसटी’ परिषदेने घेतला आहे, असे म्हणत काँग्रेसला श्रेय द्यायला पात्रा यांनी अप्रत्यक्षपणे नकार दिला.

मदरशांच्या चौकशीला उच्च न्यायालयाची स्थगिती

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील ५५८ अनुदानित मदरशांच्या चौकशीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. या मदरशांमध्ये मानवाधिकारांचे कथित उल्लंघन होत असल्याच्या आरोपांवरून पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा हा तपास करत होती. मोहम्मद तल्हा अन्सारी नावाच्या व्यक्तीने या मदरशांविरोधात केलेल्या तक्रारीवरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) २८ फेब्रुवारी, २३ एप्रिल आणि ११ जून रोजी चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारनेही २३ एप्रिलला मदरशांच्या चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीच्या निर्देशांविरोधात तसेच प्रत्यक्ष चौकशीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्या. सरल श्रीवास्तव आणि अमिताभ कुमार राय यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. न्यायालयाने ’एनएचआरस”च्या चौकशी निर्देशाला स्थगिती दिली. याचिकाकर्त्याने सरकारच्या आदेशांविरोधातही याचिका दाखल केली आहे. पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला होणार आहे.

झुबिन गर्ग यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

गुवाहाटी : गायक झुबिन गर्ग यांच्यावर गुवाहाटी शहराजवळील स्मशानभूमीत मंगळवारी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हजारो चाहत्यांनी वैदिक श्लोक म्हणत साश्रुनयनांनी आपल्या आवडत्या गायकाला निरोप दिला. या वेळी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सर्मा, केंद्रीय मंत्री सर्बनंदा सोनोवाल, किरेन रिजिजू, पबित्रा मार्गरिटा आणि आसामचे विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांच्यासह अनेक मंत्री, ज्येष्ठ नेते उपस्थित होते. २०१७ मध्ये गर्ग याच्या वाढदिवशी लावण्यात आलेल्या चंदनाच्या झाडाचा अत्यंसस्कारामध्ये वापर करण्यात आला. झुबिन याचे पार्थिव भोगेश्वर बहुआ क्रीडा संकुलात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तत्पूर्वी, त्याचे गुवाहाटी वेद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यात आले. त्याचे पहिले शवविच्छेदन मृत्यू झाल्यानंतर सिंगापूर येथे १९ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.

अण्वस्त्रांसंबंधी ‘स्टार्ट’चे नूतनीकरण गरजेचे; रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा अमेरिकेसमोर प्रस्ताव

मॉस्को : ‘अमेरिकेबरोबर अण्वस्त्रांसंबंधीच्या ‘सामरिक शस्त्रकपातीच्या करारा’चे (स्टार्ट) येत्या फेब्रुवारीनंतर नूतनीकरण झाले नाही, तर ते आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याचे आहे,’ अशी प्रतिक्रिया रशियाने दिली आहे. ‘क्रेमलिन’चे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, ‘या करारानुसार सामरिक अण्वस्त्रे तैनात करण्यासाठी असलेल्या मर्यादा आणखी एका वर्षभरासाठी दोन्ही बाजूंनी तशाच ठेवायला हव्यात, असा पुतिन यांनी अमेरिकेसमोर प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव अमेरिकेने मान्य केला नाही, रशियाला उपाय योजावे लागतील.’ अमेरिका-रशियामधील ‘स्टार्ट’ करार पुढील वर्षी ५ फेब्रुवारी रोजी संपत आहे. तत्पूर्वी आणखी एका उपकराराचा विचार करू शकत नाही, असे पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘वेळ हातातून निघून चालली आहे. दोन्ही देशांमध्ये सामरिक स्थिरता, सुरक्षेसंदर्भातील कुठलाही करार नसावा, अशी स्थिती त्यातून उद्भवेल. ही स्थिती जगासाठी खूप धोक्यांनी भरलेली असेल.’ पुतिन यांनी ठेवलेला प्रस्ताव चांगला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावर भाष्य करतील, असे ‘व्हाइट हाउस’ने म्हटले आहे.