India On Pakistan : जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. मात्र, त्यानंतर अद्यापही पाकिस्तानमधील काही नेत्यांचं भारताविरोधात गरळ ओकणं सुरूच आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे सातत्याने भारताच्या विरोधात विधाने करत धमकावत आहेत. एवढंच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही नुकतंच एक विधान करत भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, पाकिस्तानी नेत्यांच्या धमक्यांनंतर आता भारातानेही जशास तसं प्रत्युत्तर देत पाकिस्तानला ठणकावलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिल्याच्या मुद्यांवरून एक विधान केलं होतं. तसेच असीम मुनीर यांनीही सिंधू जल कराराच्या स्थगितीवरून विधान केलं होतं. आता पाकिस्तानी नेत्यांच्या धमक्यांच्या विधानानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत घेत पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. ‘पाकिस्तानी नेत्यांच्या कोणत्याही चुकीच्या कृतीचे दुःखद आणि वाईट परिणाम होतील’, अशा शब्दांत रणधीर जयस्वाल यांनी ठणकावलं आहे.

रणधीर जयस्वाल यांनी काय म्हटलं?

पाकिस्तानी नेतृत्वासह काही पाकिस्तानी नेत्यांनी भारताविरुद्ध केलेल्या टिप्पण्यांबद्दल बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं की, “पाकिस्तानी नेतृत्वाकडून भारताविरुद्ध बेपर्वा, युद्धखोर आणि द्वेषपूर्ण टिप्पण्या सुरू असल्याच्या बातम्या आम्हाला पाहायला मिळाल्या आहेत. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी वारंवार भारतविरोधी वक्तव्ये करणं ही पाकिस्तानी सुप्रसिद्ध पद्धत आहे. पाकिस्तानी नेत्यांनी आपल्या वक्तव्यांवर नियंत्रण ठेवणं चांगलं, कारण कोणत्याही चुकीच्या कृतीचे दुःखद आणि वाईट परिणाम होतील, जसं की अलीकडेच दिसून आलेलं आहे”, असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.

शाहबाज शरीफ यांनी काय विधान केलं होतं?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली. यावर टीका करत असताना शाहबाज शरीफ म्हणाले होते की, “आमच्या देशाचा पाण्याचा एकही थेंब शत्रूला आमच्यापासून आम्ही हिरावू देणार नाही. आम्ही शत्रू राष्ट्राला सांगू इच्छितो की, तुम्ही जर आमचे पाणी रोखण्याची धमकी देत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पाकिस्तानच्या वाट्याचा एक थेंबही तुम्ही पाकिस्तानपासून हिरावू शकत नाहीत. जर पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असा धडा शिकवू की पुन्हा असे कृत्य करण्याचा विचारही करणार नाहीत.”

असीम मुनीर यांनीही दिली होती धमकी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेतील टाम्पा शहरात बोलताना म्हटलं होतं की, “आता जर संघर्ष सुरु झाला तर भारताच्या पूर्व भागापासून सुरुवात करत आपण पश्चिमेच्या दिशेने जाऊ. मुकेश अंबानी यांची जामनगरमध्ये रिफायनरी आहे. ती जगातली सर्वात मोठी रिफायनरी आहे. या रिफायनरीवर हल्ला करु. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश आहे. आम्हाला बुडवण्याचा प्रयत्न झाला तर आम्हीही अर्धे जग घेऊन बुडू. पहिला हल्ला रिलायन्सच्या जामनगरमधील रिफायनरीवर करण्यात येईल.”