नवी दिल्ली : शेजारील राष्ट्राच्या कुरापती दूर करण्यासाठी बळाचा वापर करणेच गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. काही देशांमध्ये हिंदू समाजाचा छळ करण्यात आला असून या छळापासून वाचण्यासाठी हिंदू समाजाचे ऐक्य होणे आवश्यक आहे, असे भागवत यांनी सांगितले.

संघ विचारांच्या ‘ऑर्गनायझर’ आणि ‘पांचजन्य’ या साप्ताहिकांना दिलेल्या मुलाखतील सरसंघचालकांनी हिंदू समाजाचे ऐक्य आणि राष्ट्र सुरक्षेवर भर दिला. भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि संघटनेचा तोच शाश्वत विचार आहे हे लक्षात घेऊनच संघाची वाटचाल सुरू आहे. भारताला शक्तिशाली आणि नीतिमान बनविण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र आले पाहिजे, असे भागवत म्हणाले.

पहलगाम हल्ला आणि त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी राष्ट्रीय सुरक्षेबद्दल आपले विचार व्यक्त केले. ‘‘भारताने सद्गुण आणि शक्ती दोन्हीची पूजा केली पाहिजे. चांगल्या गोष्टींच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आपण शक्तिशाली असणे गरजेचे आहे. आपल्या सर्व सीमांवर दुष्टपणा वाढला असल्याने शक्तिशाली असण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही,’’ असे ठाम मत सरसंघचालकांनी मांडले.

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवरील लष्करी कारवाईबद्दल सरसंघचालकांनी सरकारचे कौतुक केले. हे हल्ले भारताच्या सुरक्षेसाठी अपरिहार्य होते. या लष्करी हल्ल्यांमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि मनोबल वाढले, असे भागवत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरवशाली भारतासाठी हिंदू ऐक्याची हाक

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांचा संदर्भ देत भागवत म्हणाले, हिंदू समाजाला या छळापासून वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी जोडलेले असल्याने हिंदू समाजाचे गौरवशाली स्वरूपच भारताला गौरव मिळवून देईल. हिंदू समाज मजबूत झाला, तर अनेक शक्ती एकत्र आल्या तरी त्यांच्यावर मात करता येईल, असे भागवत म्हणाले.