भारताचे दलवीर भंडारी यांचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनने क्रिस्टोफर ग्रीनवुड यांचे नामांकन मागे घेतल्याने भंडारी यांची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भंडारी यांची ही दुसरी टर्म आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात १५ न्यायाधीशांची संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे ९ वर्षांसाठी नेमणूक होते. मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड करण्यात आली होती. भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ ५ फेब्रुवारी २०१८ रोजी संपत असून या पदासाठी भारताने पुन्हा न्या. भंडारी यांना नामांकन जाहीर केले होते.

न्या. भंडारी यांच्या फेरनियुक्तीत ब्रिटनचा अडथळा होता. ब्रिटनने या पदासाठी क्रिस्टोफर ग्रीनवुड यांना नामांकन जाहीर केले होते. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ब्रिटनचा समावेश असून अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन या देशांचे ग्रीनवुड यांना समर्थन होते. त्यामुळे ब्रिटनचे पारडे जड दिसत होते.

अकरा फेरीत संयुक्त राष्ट्राच्या महासभेत न्या. भंडारी यांना बहुमत मिळाले होते.  मात्र सुरक्षा परिषदेत भंडारी पिछाडीवर होते. यासाठी १२ वी फेरी पार पडणार होती. मात्र त्यापूर्वीच ब्रिटनने माघार घेतली आणि न्या. भंडारी यांचा मार्ग मोकळा झाला. आमच्या निकटच्या मित्राच्या (भारत) विजयाचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ब्रिटनने दिली.

भंडारी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४७ मध्ये झाला. वकिलीचा वारसा त्यांना आजोबा बी. सी. भंडारी आणि वडील महावीरचंद भंडारी यांच्याकडून मिळाला. भंडारी यांनी राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. यानंतर अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. काही काळ शिकागोत वकिली केल्यानंतर ते भारतात परतले. १९७३ ते १९७६ या काळात राजस्थान हायकोर्टात वकिली केली. तिथून १९७७ मध्ये ते दिल्ली हायकोर्टात वकिली करण्यासाठी गेले. या क्षेत्रातील २३ वर्षांच्या अनुभवानंतर १९९१ साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर २००५ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली सुनावलेल्या देहदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती. या प्रकरणातील १५ न्यायाधीशांमध्ये न्या. दलवीर भंडारी यांचा समावेश होता.