India on PoK protests : पाकिस्तान व्याप्त काश्मीर(PoK)मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी भारताने प्रतिक्रिया दिली असून पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये होत असलेली निदर्शने ही पाकिस्तान सरकारकडून अवलंबण्यात आलेले दडपशाहीचे धोरण आणि संसाधनांची पद्धतशीर लूट याचा परिणाम असल्याचे म्हटले आहे.

साप्ताहिक पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी निदर्शकांविरोधात हिंसक पद्धतीने केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. तसेच त्यांनी भीषण मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले पाहिजे असे म्हटले आहे.

जयस्वाल म्हणाले की, “पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील अनेक भागात निदर्शने यासह पाकिस्तानी लष्कराच्या निष्पाप नागरिकांवरील क्रूरतेचे वृत्त आम्ही पाहिले आहे. आम्हाला वाटते की, ही आंदोलने पाकिस्तानच्या जबरदस्तीने आणि बेकायदेशीर कब्जाखाली असलेल्या या प्रदेशांमधील दडपशाहीचे धोरण आणि संसाधनांच्या पद्धतशीर लूटमारीचा परिणाम आहे. पाकिस्तानला त्यांच्या या भीषण मानवी हक्क उल्लंघनांसाठी जबाबदार धरलेच पाहिजे.”

गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह किमान ९ जणांचा मृत्यू झाला आहे. विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिकांच्या जॉइंट आवामी ॲक्शन कमिटी (Joint Awami Action Committee) या गटाच्या नेतृत्वाखालील या आंदोलकांचे आंदोलन केले जात आहे. या आंदोलकांच्या आर्थिक ते राजकीय अशा एकूण ३८ मागण्या आहेत.

२९ सप्टेंबरपासून जेएएसीने त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बंदची घोषणा केली आहे. यादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईनंतरही परिस्थिती जास्तच चिघळल्याचे पाहायला मिळाले.