पीटीआय, नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तानने आण्विक आस्थापनांची यादी परस्परांना दिली आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. आण्विक केंद्रांवर हल्ले करू नये, यासाठी दोन्ही देश गेल्या तीन दशकांपासून ही यादी परस्परांना देतात. तसा करार दोन्ही देशांत झाला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की राजनैतिक माध्यमातून भारत आणि पाकिस्तानने बुधवारी आण्विक आस्थापनांची यादी परस्परांना दिली. या आस्थापनांवर आणि आण्विक केंद्रांवर करारानुसार हल्ला करण्यास प्रतिबंध आहे. हा करार ३१ डिसेंबर १९८८ रोजी झाला. २७ जानेवारी १९९१पासून कराराची अंमलबजावणी होत आहे.

हेही वाचा : संरक्षण दलांसाठी २०२५ हे ‘सुधारणा वर्ष’, सशस्त्र दले अधिक सुसज्ज, अत्याधुनिक करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भारतीय मच्छिमारांची सुटका करावी’

पाकिस्तानात तुरुंगवासाच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झालेल्या १८३ भारतीय मच्छिमार आणि सामान्य नागरिकांची सुटका करावी, अशी विनंती भारताने बुधवारी केली. तसेच, १८ नागरिक आणि मच्छिमारांना भेटण्यासाठी भारताच्या वकिलातीला परवानगी द्यावी, अशीही विनंती भारताने केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. दर वर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी दोन्ही देशांत तुरुंगवासात असलेल्या नागरिकांची यादी परस्परांना दिली जाते. २००८ मध्ये हा करार झाला. भारताने ३८१ नागरिकांची आणि ८१ मच्छिमारांची यादी पाकिस्तानकडे दिली, तर पाकिस्तानने ४९ नागरिक आणि २१७ मच्छिमारांची यादी दिली.