Sleeper Cells In Jammu And Kashmir: भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान, मेसेजिंग ॲप्सद्वारे सुरक्षा दल आणि महत्त्वाच्या संस्थांबद्दलची संवेदनशील माहिती शेअर करण्याशी संबंधित एका प्रकरणात जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास संस्थेने रविवारी दक्षिण काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. यावेळी संस्थेने अनेक लोकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त केल्याचे सांगितले आहे.
काश्मीरमधील अनेक स्लीपर सेल्स…
एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात, एसआयएने म्हटले आहे की, “जम्मू आणि काश्मीर पोलीस काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्यांवर आणि ओव्हर ग्राउंड वर्कर्सवर लक्ष ठेवून आहेत. तांत्रिक गुप्तचर यंत्रणांच्या तपासात असे दिसून आले आहे की, काश्मीरमधील अनेक स्लीपर सेल्स पाकिस्तानमध्ये असलेल्या त्यांच्या हँडलर्सशी थेट संपर्कात होते. हे स्लीपर सेल्स त्यांना व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सिग्नल इत्यादी मेसेजिंग ॲप्सद्वारे सुरक्षा दलांबद्दल व महत्त्वाच्या संस्थांबद्दल संवेदनशील आणि धोरणात्मक माहिती देत होते.”
एसआयएचे २० ठिकाणी छापे
रविवारी सकाळी, राज्य तपास यंत्रणेने दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियान, कुलगाम आणि अनंतनाग या चार जिल्ह्यातील २० वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) च्या विविध कलमांखाली नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला.
लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रचार
एसआयएने म्हटले आहे की, “दहशतवाद्यांचे हे सहकारी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कमांडरांच्या आदेशानुसार ऑनलाइन कट्टरपंथी प्रचारातही सहभागी होते. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेवर परिणाम होत होता. प्राथमिक तपासात स्पष्टपणे दिसून आले आहे की, या संस्था दहशतवादी कटात सक्रियपणे सहभागी आहेत, भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला आव्हान देण्यासाठीच नव्हे तर असंतोष, सार्वजनिक अव्यवस्था आणि सांप्रदायिक द्वेष भडकवण्याच्या उद्देशाने भारतविरोधी प्रसार करत आहेत.”
तपास यंत्रणेने सांगितले की छाप्यांमध्ये बरीच गुन्हेगारी सामग्री जप्त करण्यात आली आहे आणि पुढील चौकशीसाठी अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.