India Pakistan Tension : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेत आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे भारतीय लष्कर कधीही कारवाई करू शकतं, या भितीने पाकिस्तानची चलबिचल वाढल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करण्यात येत असल्याची तिसरी घटना समोर आली आहे. भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका पाकिस्तानी व्यक्तीला पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) एका पाकिस्तानी नागरिकाला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसातील ही तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी रेंजरला अटक करण्यात आली होती. तसेच ३ आणि ४ मे रोजी मध्यरात्री पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी नागरिकाला भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना अटक केली होती. मोहम्मद हुसेन असं त्या व्यक्तीचं नाव होतं. त्यानंतर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

या बरोबरच राजस्थानमध्ये देखील पाकिस्तानच्या निमलष्करी दलातील एका सदस्याला अटक करण्यात आली होती. तेव्हा प्राथमिक तपासात असं दिसून आलं की एक रेंजर भारतात हेरगिरी किंवा गुप्तहेर मोहिमेवर होता. आता त्याची बीएसएफकडून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पंजाबमध्ये चुकून सीमा ओलांडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेले भारताचा बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ अजूनही त्यांच्या ताब्यात आहे. यावरून भारताने तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच बीएसएफने पाकिस्तानकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. मात्र, भारताच्या त्या बीएसएफ जवानाला सोडण्यास इस्लामाबादने नकार दिला आहे.