Donald Trump Nobel Peace Prize : भारत-पाकिस्तानसह अनेक देशांमधील युद्ध रोखल्याचा दावा करणारे व जगावर व्यापार युद्धाचं संकट निर्माण करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबल पुरस्कार दिला जावा यासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. हीच गोष्ट आता जागतिक व्यासपीठावर चर्चेत आहेत. कारण, पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरून ही मागणी उठली असून अनेक देशांनी या मागणीचं समर्थनही केलं आहे. दरम्यान, या मागणीवर भारताची भूमिका काय असा प्रश्न भारतीयांना पडला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर नुकतंच भाष्य केलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी शुक्रवारी (१ ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा अशी मागणी होत आहे. त्यावर भारताची भूमिका काय? व्हाइट हाऊसने देखील या मागणीचं समर्थन केलेलं असताना भारत या घडामोडींकडे कसं पाहतो? या प्रश्नावर उत्तर देताना जायस्वाल म्हणाले, “तुम्हाला व्हाइट हाऊसबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारा. कारण ट्रम्प यांना नोबेल देण्याच्या मागणीबाबत व्हाइट हाऊसच स्पष्टपणे माहिती देऊ शकतं.”
जायस्वाल यांच्या उत्तरावरून स्पष्ट होतंय की भारताला या मुद्द्यापासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. भारताला कोणत्याही आंतरराष्ट्रीय राजकीय वादात उडी घ्यायची नाही.
व्हाइट हाऊसने नेमकं काय म्हटलंय?
व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी अलीकडेच दावा केला होता की डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता निर्माण करण्यासाठी अनेक यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संघर्ष थांबवले आहेत. ट्रम्प यांनी अनेक देशांमध्ये युद्धविराम घडवून आणला आहे. अनेक देशांमध्ये प्रदीर्घ काळापासून चालू असलेला संघर्ष शांतता कराराने संपुष्टात आणला आहे. त्यांच्या नेतृत्वक्षमतेमुळे वैश्विक स्थिरतेला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळेच ते शांततेतच्या नोबल पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार आहेत.
व्हाइट हाऊसने म्हटलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी थायलंड व कम्बोडिया, इस्रायल-इराण, रवांडा व कॉन्गो (कॉन्गोचे लोकशाही प्रजासत्ताक), भारत व पाकिस्तान, सर्बिया व कोसोव्हो, इजिप्त व इथियोपियासारख्या देशांमधील संघर्ष थांबवून शांतता निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचं योगदान दिलं आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये ट्रम्प यांनी सरासरी प्रत्येक महिन्याला एक युद्ध थांबवण्यात, शांतता करार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.