scorecardresearch

देशात पुन्हा रुग्णवाढ ; दिल्लीत संसर्गदर ८ टक्क्यांवर, राज्यात बाधितांची दैनंदिन संख्या दुपटीवर

देशात गेल्या २४ तासांत १,१७४ रुग्ण आढळल़े  महाराष्ट्रातही सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दुपटीहून अधिक (१३७) रुग्ण आढळल़े

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी दिल्ली, मुंबई : देशात करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आह़े  दिल्लीत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ८ टक्क्यांवर पोहोचले असून, महाराष्ट्रातही मंगळवारी दुप्पट रुग्णवाढ नोंदविण्यात आली़  रुग्णवाढीमुळे मुंबईत यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े

दिल्लीत सलग दोन दिवस करोना रुग्णांची संख्या प्रत्येकी ५०० नोंदवण्यात आली. दिल्लीत आठवडाभरात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण तिपटीने वाढले आह़े  देशात गेल्या २४ तासांत १,१७४ रुग्ण आढळल़े  महाराष्ट्रातही सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दुपटीहून अधिक (१३७) रुग्ण आढळल़े  त्यात मुंबईतील सर्वाधिक ८५ रुग्णांचा समावेश आह़े  यामुळे मुंबई पालिका सतर्क झाली आह़े

मुंबईमध्ये हवाई मार्गाने येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत़े परंतु, रेल्वे किंवा अन्य मार्गाने येणाऱ्या नागरिकांचा शोध घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या विभागांमध्ये मुंबईबाहेरून व्यक्ती किंवा कुटुंबे वास्तव्यास येत आहेत, का याची पाहणी करण्याची सूचना प्रशासनाने विभाग कार्यालयांना दिली आहे. या व्यक्तींना कोणतीही लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या तातडीने चाचण्या करण्याची सूचनाही (पान ४ वर) (पान १ वरून) प्रशासनाने दिली़  उपचारासाठी येणाऱ्या व्यक्तींना करोनासदृश्य लक्षणे आढळल्यास तातडीने आणि सक्तीने करोना चाचण्या करण्याच्या सूचना खासगी डॉक्टरांना द्याव्यात, असे आदेश पालिकेने विभाग कार्यालयांना दिले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील रुग्णसंख्येत काही अंशी वाढ झाली आह़े  रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमीच आहे. सध्या रुग्णालयात केवळ १२ रुग्ण दाखल आहेत.

मुंबईला फारसा धोका नाही

मुंबईत सेरो सर्वेक्षणामध्ये ९९ टक्के अत्यावश्यक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. तसेच लसीकरणही मोठय़ा प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये रुग्णसंख्या वाढली तरी मुंबईत फारशी रुग्णसंख्या वाढण्याचा धोका नाही. दिल्लीमध्ये नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी आहेत. त्यामुळे मुंबईत काही प्रमाणात रुग्णवाढ झाली असली तरी रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण पूर्ण करावे आणि मुखपट्टीची सक्ती नसली तरी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तिचा वापर करावा, असे मत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केले.

लसीकरण वाढविण्याचे आदेश

वर्धक मात्रा आणि १२ ते १७ वयोगटातील लसीकरण वाढविण्यावर भर देण्याचे आदेश पालिकेने विभागांना दिले आहेत. तसेच २६६ करोना चाचणी केंद्रे सुरू असून, चाचण्या आणि मुखपट्टी वापरण्याबाबत जनजागृती करण्याची सूचनाही पालिकेने दिली आह़े

ही चौथी लाट नाही!

दैनंदिन करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात येत असली तरी तज्ज्ञांच्या मतानुसार, सलग सुट्टय़ा आणि सण-उत्सवांमुळे नागरिक एकत्र येत असल्याने ही रुग्णवाढ दिसत आहे. मात्र, चौथ्या लाटेची सुरुवात झाली, असे लगेच म्हणता येणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आह़े

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India record 1174 new covid cases in the last 24 hours zws