बलुचिस्तानमध्ये शाळेच्या बसला लक्ष्य करून करण्यात आलेल्या प्राणघातक आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. हे आरोप फेटाळताना भारताने म्हटले आहे की, भारतावर अशा प्रकारचे आरोप करून पाकिस्तान स्वतःच्या अपयशांवरून जगाला विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे.

बुधवारी सकाळी खुजदार शहरात झालेल्या या स्फोटात किमान चार मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून, ३५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संशयित आत्मघाती बॉम्बरने स्फोटकांनी भरलेले वाहन आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर धडकवले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या आरोपांचा निषेध केला आणि म्हटले की, पाकिस्तान स्वतःच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा युक्त्या वापरतो.

केंद्र सरकारने पाकिस्तानचे आरोप फेटळाणारे एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, “खुजदार येथील घटनेत भारताचा सहभाग असल्याचे पाकिस्तानचे आरोप निराधार आहेत. पण, दहशतवादाचे जागतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तान त्यांनी केलेल्या दुष्कृत्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी आणि स्वतःच्या अपयशांना लपवण्यासाठी भारताला दोष देतो. आपल्या सर्व अंतर्गत समस्यांसाठी भारताला दोष देणे हा पाकिस्तानचा स्वभाव बनला आहे. जगाला मूर्ख बनवण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरणार नाही.”

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये एका शाळेच्या बसवर आज सकाळी आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, ३८ जण जखमी आहेत. असोसिएटेड प्रेसच्या हवाल्याने हिंदूस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना बलुचिस्तान प्रांतातील खुजदार जिल्ह्यात हा हल्ला झाला, अशी माहिती स्थानिक पोलीस उपायुक्त यासिर इक्बाल यांनी दिली. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण बलोच टीरतावाद्यांनी हा हल्ला केला असल्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्याकडूनच सातत्याने स्थानिक आणि लष्करांना लक्ष्य केलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून बंडखोरी सुरू आहे, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह अनेक फुटीरतावादी गट हल्ले करत आहेत. अमेरिकेने २०१९ मध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला, बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर अधिक हल्ले करण्याची घोषणा केली होती.