जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याठिकाणी काय उपाययोजना राबवाव्यात, हा आमचा अंतर्गत विषय आहे. ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत, त्यांच्या बोलण्याकडे भारत लक्ष देत नाही, अशी खमकी भूमिका भारताने बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या ५५ व्या मानवाधिकार परिषदेत मांडली. पाकिस्तानने भारतावर केलेल्या टिप्पणीनंतर भारताच्या प्रतिनिधी, प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत असून अनुपमा सिंह यांचे कौतुक केले जात आहे.

भारताला बोलण्याची संधी मिळाल्यानंतर अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानच्या टिप्पणीचा खरपूस समाचार घेतला. पाकिस्तानला ठणकावताना त्या म्हणाल्या, “पाकिस्तानने पुन्हा एकदा या परिषदेच्या व्यासपीठाचा चुकीचा वापर केला असून भारतावर उघडपणे खोटे आरोप केले आहेत. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. भारतामधील जम्मू आणि काश्मीरची संपूर्ण सीमा आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे. याभागात सामाजिक-आर्थिक विकास व्हावा, यासाठी भारत सरकार काळजी घेत असून त्यासंबंधी उपाययोजनाही राबविल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरसारख्या केंद्रशासित प्रदेशात प्रशासन कसे असावे, हा संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे. भारताच्या अंतर्गत बाबीवर बोलण्याचा पाकिस्तानलाही कोणताही अधिकार नाही.”

पाकव्याप्त काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ जागा राखीव; लोकसभेत विधेयक मंजूर

पाकिस्तानमधील मानव अधिकाराबाबत बोलताना सिंह म्हणाल्या, ज्या देशाने त्यांच्या भूमीवरील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांना पद्धतशीरपणे संस्थात्मक रुप दिले आहे. हे पाहता मानवी हक्कांची ही पायमल्लीच आहे. अशा देशाने भारतासारख्या आर्थिक प्रगती आणि सामाजिक न्याय प्रदान करण्यात मोठी आघाडी घेतलेल्या देशावर भाष्य करणे हास्यास्पद तर आहेच, त्याशिवाय हे विकृतीचेही लक्षण दिसते.

पाकिस्तानमध्ये मागच्या वर्षीच ख्रिश्चन नागरिकांवर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख सिंह यांनी आपल्या भाषणात केला. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत आहे, असाही आरोप त्यांनी केला. “ऑगस्ट २०२३ मध्ये पाकिस्तानच्या जरनवाला शहरात अल्पसंख्याक असलेल्या ख्रिश्चन समाजावर अत्याचार करण्यात आले. त्याठिकाणी १९ चर्च पाडण्यात आले आणि ८९ ख्रिश्चनांची घरे जाळण्यात आली. अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचे हे ताजे उदाहरण आहे”, अशी टीका सिंह यांनी केली.