उत्तरप्रदेशातील अमेठी येथील कारखान्यात सहा लाख एके-२०३ रायफलींचे संयुक्तरीत्या उत्पादन करणे आणि १० वर्षांसाठी आणखी लष्करी करार यांसह चार संरक्षणविषयक करारांवर भारत व रशिया यांनी सोमवारी स्वाक्षऱ्या केल्या. विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्य, अफगाणिस्तानातील स्थितीमुळे निर्माण होणारे संभाव्य प्रश्न, दहशतवादाचा मुकाबला आदींसाठी उभय देशांनी एकूण नवे २८ करार सोमवारी केल्याची माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी दिली.

संरक्षण करारात अंतर्भूत असलेल्या एके-२०३ रायफली भारतीय सशस्त्र दलांसाठी सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्चून तयार केल्या जाणार आहेत.

Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…

लष्करी व लष्करी- तांत्रिक सहकार्याबाबतच्या भारत- रशिया सरकारी आयोगाच्या (आरआयआयसीसी- एम अँड एमटीसी) विसाव्या बैठकीत या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व त्यांचे रशियन समपदस्थ जनरल सर्जे शोइगु यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लष्करी उपकरणांचे संयुक्त उत्पादन वाढवण्यासह सामरिक सहकार्य आणखी बळकट करण्याच्या उपायांवरही चर्चा करण्यात आली.

लहान शस्त्रांच्या कलाश्निकोव्ह मालिकेचे उत्पादन करण्याच्या क्षेत्रातील सहकार्याबाबत यापूर्वी फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आलेल्या करारात सुधारणा करण्याचा करारही दोन्ही बाजूंनी केला.

इंडो- रशिया रायफल्स प्रा.लि. मार्फत ६,०१,४२७ एके-२०३ अ‍ॅसॉल्ट रायफलींचे उत्पादन करण्याचा करार हा या चार करारांपैकी सर्वात महत्त्वाचा करार होता. लष्करी सहकार्याबाबतचा १० वर्षांचा करार हा सध्याच्या चौकटीचे नूतनीकरण आहे.

रशिया हा भारताचा दीर्घकाळापासून विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त असा सामरिक भागीदार असून; आमचे संबंध काळाच्या कसोटीवर उतरलेले, तसेच बहुपक्षीयता, जागतिक शांतता व समृद्धी, परस्पर सामंजस्य आणि विस्वास यांच्या सामायिक हितांवर आधारित आहेत, असे राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. या सहकार्यामुळे या क्षेत्रात शांतता, समृद्धी व स्थैर्य येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भारत महान शक्ती : पुतिन

नवी दिल्ली : भारत ही एक महान शक्ती, एक मैत्रीपूर्ण देश आणि काळाच्या कसोटीवर सच्चा ठरलेला मित्र आहे, असे कौतुकोद्गार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी काढले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पुतिन यांनी अनेक विषयांवर व्यापक चर्चा केली. दहशतवाद, अमली पदार्थ तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यांबद्दलच्या दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली.

पुतिन यांनी अफगाणिस्तानातील घडामोडींबद्दलही चिंता व्यक्त केली. भारत आणि रशिया प्रादेशिक आव्हानांबाबत यापुढेही परस्परांतील समन्वय कायम ठेवतील, अशी ग्वाहीही पुतिन यांनी दिली.

‘‘आम्ही भारताला एक महान शक्ती, एक मैत्रीपूर्ण राष्ट्र आणि काळाच्या कसोटीवर टिकलेला मित्र मानतो. आमच्यातील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होत आहेत. माझे लक्ष भविष्याकडे’’, असे सूचक वक्तव्य पुतिन यांनी केले. दोन्ही देश जागतिक समस्यांवर परस्पर सहकार्य पुढेही सुरू ठेवतील. तसेच अनेक समस्यांवर दोन्ही देशांच्या भूमिकेत सारखेपणा आहे, असेही पुतिन यांनी सांगितले.

सीमाक्षेत्रातील आव्हानांवर मात करण्याचा विश्वास

नवी दिल्ली : आमच्या लगतच्या प्रदेशातील ‘असामान्य लष्करीकरण’ आणि उत्तर सीमेवर ‘विनाकारण आक्रमण’ ही देशापुढील प्रमुख आव्हाने आहेत, असे रशियासोबतच्या ‘२ अधिक २’ संरक्षण आणि परराष्ट मंत्रिस्तरीय संवादाच्या सुरुवातीला भारताने सांगितले.प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि आपल्या लोकांची अंगभूत क्षमता यांच्या आधारे या आव्हानांवर मात करण्याचा भारताला विश्वास आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संवादाच्या उद््घाटनप्रसंगी सांगितले. सिंह यांच्याशिवाय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, त्यांचे रशियन समपदस्थ सर्जेई लॅव्हरॉव्ह आणि संरक्षण मंत्री जनरल सर्जे शोइगु हे या चर्चेत सहभागी झाले आहेत.