वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
‘‘भारताने रशियाकडून केलेली शस्त्रखरेदी आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘ब्रिक्स’ देशांबरोबर केलेल्या प्रयत्नांचा अमेरिकेला फटका बसला. मात्र, आता भारताने अमेरिकेला वाटणाऱ्या या चिंतांचे निराकरण केले असून, दोन्ही देशांत लवकरच व्यापार करार होईल,’’ असे प्रतिपादन अमेरिकेचे वाणिज्यमंत्री होवार्ड लुटनिक यांनी केले.
‘‘उत्पादन क्षेत्रात अमेरिकेला पुन्हा चांगले दिवस आणायचे असून व्यापारी तूट कमी करण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे,’’ या भूमिकेचा लुटनिक यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘‘भारताने यापूर्वी अशा काही गोष्टी केल्या आहेत, की ज्याचा अमेरिकेला फटका बसला आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर भारत शस्त्रे साधारण रशियाकडून खरेदी करतो. अमेरिकेला हे कसे सहन होईल? भारताने आता अमेरिकेकडून शस्त्रखरेदी करण्यास सुरुवात केली आहे. याखेरीज, डॉलरचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी ब्रिक्स देशांशी केलेले सहकार्य. अशा रितीने अमेरिका तुमचा मित्र देश होऊ शकत नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांनी या बाबी भारतासमोर थेट आणि विशेष स्वरुपात मांडल्या आणि भारतही त्याला थेट आणि विशेष असा प्रतिसाद देत आहे. दोन्ही देश अशा रीतीने सकारात्मक पातळीवर पोहोचले आहेत.’’
दरम्यान, भारताबरोबर जुलै महिन्यात व्यापारी करार होण्याची शक्यता असल्याचे लुटनिक यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.