Pakistan Imports Blocked In India: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. यामध्ये आता आणखी निर्णयाची भर पडली असून, केंद्र सरकारने पाकिस्तानमधून युएईसारख्या तिसऱ्या देशाच्या माध्यमातून भारतात येणाऱ्या सर्व वस्तू किंवा मालावर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. तिसऱ्या देशाच्या माध्यमातून भारतात येणारा पाकिस्तानचा माल थांबवण्याचे काम महसूल गुप्तचर संचालनालयाने सुरू केले आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानातून येणारे खजूर आणि सुकामेवा यूएईमार्गे भारतात येत असल्याचा संशय आहे आणि हा मुद्दा तेथील सरकारसमोरही उपस्थित करण्यात आला आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली आहे.
या सरकारी अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “तिसऱ्या देशांमधून येणाऱ्या वस्तूंबाबत, केवळ मूळ प्रमाणपत्रांच्या नियमांवर आधारित पाकिस्तानी मूळाच्या वस्तू ओळखणे कधीकधी कठीण असते. पण, लेबलिंग पडताळणीद्वारे बारकाईने तपासणी केल्यास अनेकदा उत्पादनाचे खरे मूळ उघड होते.”
सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर कडक देखरेख ठेवली जात आहे. यामध्ये २ मे पूर्वी पाकिस्तानमधून पाठवलेल्या वस्तूंचाही समावेश आहे. त्यांनी सांगितले की, अलिकडेच पाकिस्तानी ध्वज असलेल्या एका जहाजाला तपास अधिकाऱ्यांनी डॉक करण्यास परवानगी नाकारली होती.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने २ मे रोजी एक अधिसूचना जारी केली होती आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानमधून सर्व प्रकारच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घातली होती. याशिवाय, अटारी सीमेवरील एकात्मिक चेकपोस्ट देखील २४ एप्रिल रोजी बंद करण्यात आला होता. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील ३८८६ कोटी रुपयांचा व्यापार थांबेल असा अंदाज होता.
भारत-पाकिस्तान व्यापार आकडेवारी
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अंदाजानुसार, ट्रान्स-शिपमेंट हब मार्गांनी सुमारे १० अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीचा भारतीय माल पाकिस्तानला जातो.
दोन्ही देशांमधील तणावामुळे, विशेषतः २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर २०१८-१९ मधील ४,३७०.७८ कोटी रुपयांचा द्विपक्षीय व्यापार २०२२-२३ मध्ये २,२५७.५५ कोटी रुपयांवर आला. पण, २०२३-२४ मध्ये व्यापार पुन्हा ३,८८६.५३ कोटी रुपयांवर पोहोचला, जो गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे, एकूण मालवाहतूक देखील २०१८-१९ मधील ४९,१०२ खेपांवरून २०२२-२३ मध्ये फक्त ३,८२७ वर आली, असे आकडेवारी दर्शवते.