आंतरराष्ट्रीय सीमेवर चाललेल्या गोळीबाराबाबत भारत व पाकिस्तानमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असतानाच, भारत हा पाकिस्तानला ‘कमी तीव्रतेच्या युद्धात’ गुंतवून ठेवू इच्छित असल्याचा आरोप पाकच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे.
भारत आम्हाला आमच्या पूर्व सीमेवर कमी तीव्रतेच्या युद्धात गुंतवून ठेवू इच्छितो. त्यासाठी ते आमच्या सैन्याला सर्व आघाडय़ांवर गुंतवून ठेवण्याचे नेहमीचे डावपेच वापरत आहेत, असे पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या पाच-सहा महिन्यात आम्ही शांतता राखण्यासाठी भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यांना ही भाषा कळत नाही असे दिसते. त्यांनी गोळीबारात पाकिस्तानी सैनिकांचा बळी घेतला आहे. आता आम्ही ‘त्यांना कळेल अशा भाषेत उत्तर देऊ’, अशी धमकी आसिफ यांनी दिली.
लखवीच्या जामिनाविरोधात मंगळवारी सुनावणी
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीऊर रहिमान लखवी याच्या जामिनाविरोधात पाकिस्तान सरकारने दाद मागितली आहे. त्याची सुनावणी इस्लामाबाद उच्च न्यायालयात मंगळवारी (सहा जानेवारीला) होणार आहे. सरकारच्या अर्जावर तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.